एक रखरखीत दुपार वर निबंध | An awkward afternoon Essay in Marathi | An awkward afternoon Nibandh

An awkward afternoon Essay in Marathi |An awkward afternoon Nibandh

एक रखरखीत दुपार मराठी निबंध हा पुढील प्रमाणे लिहीता येईल. मे महिन्याने मध्य गाठला होता आणि आपले आगळे अस्तित्व तो जाणवून दयायला लागला होता-विशेषतः मध्यान्हीच्या वेळी. अशाच मे महिन्यातील एक रखरखीत दुपार होती ती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे सुखवस्तू समाज त्या रखरखीतपणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी चार भिंतींच्या आड लपला होता. डोक्यावर विजेचे पंखे भिरभिरत होते. कुठे थंड पाण्याच्या सहवासात फिरणारे ‘रूम कूलर’ त्या रखरखीतपणावर मात करीत होते. बहुतेक दारे, खिडक्या वाळ्याच्या पडदयांनी सज्ज झाल्या होत्या. तरी आतील मानवी समाज कुरकुरत होता, ‘काय उकडत आहे!

काळाकुळकुळीत डांबरी रस्ता उन्हाने तळपत होता. जणू संतप्त सहस्ररश्मींचा काही गुन्हाच त्याने केला होता. उन्हाने हवालदिल झालेल्या रस्त्याचे काळे अंतःकरण आता द्रवू लागले होते. त्या रस्त्याला काटकोनात छेदणारा बोळ सुद्धा उदास आणि एकाकी दिसत होता. नेहमी तेथे ‘विटीदांडूचा खेळ’ किंवा ‘क्रिकेटचा गेम’ रंगलेला असतो. पण आज चिटपाखरूही त्या गल्लीबोळात दिसत नव्हते. आता पाऊण एक महिना त्या गल्लीला दुपारचा असाच एकाकीपणा साहावा लागणार होता.

अशा या रणरणत्या दुपारीही समोर काहीतरी नवीन बांधकाम चालले होते. येणाऱ्या दिवाळीपूर्वी ते काम पूर्ण करण्यासाठी अनेक मजूर तेथे खपत होते. डोक्याला बांधलेला रुमाल एवढाच काय तो त्यांच्याकडे उन्हाला आडोसा होता. झाडाच्या सावलीत बसलेले कुत्रेही अस्वस्थ होते. त्यांची जीभ तोंडाबाहेर लोंबत होती. त्या सून्न वातावरणाचा भंग करणारा आवाज झाला, “भांडीऽऽ, बाई, भांडी घ्या.” त्या बाईच्या डोक्यावरील भल्यामोठ्या टोपलीत भांडी होती व त्यांवर जून्या कपड्यांचे बोचके ठेवलेले होते. उन्हाने थकलेली ती, पाण्याचा नळ शोधीत असावी. मी तिला हाक मारली आणि थंडगार पाण्याचा ग्लास पूढे केला. “अग, कशाला हिंडतेस या रणरणत्या दुपारी?” “बाई, दुपार नाही पाहिली तर संध्याकाळ कशी गवसायची!” तिच्या एकाच वाक्याने केवढे विदारक सत्य उघड केले. ही रखरखीत दुपार आपल्याला जीवनातील रखरखीतपणा सहन करण्याचे सामर्थ्य देत असते, असेच जणू ती सांगू पाहत होती.

एखादया शीघ्रकोपी दुर्वासाचा संताप शांत झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील रेषा जशा सुरकुतत जातात, तसा या दुपारचा ‘ऐनपणा’ संपल्यावर ही सुद्धा सुरकुतू लागते. घड्याळाचे काटे पाचाकडे सरकले की ही चवताळलेली महामाया दोनप्रहरी शांत होऊ लागते आणि सुस्तावलेले वारेही ये-जा करू लागतात. सहस्ररश्मी आपले चाबूक आवरते घेतो. मग घरात लपलेली माणसे बाहेर येतात. तापलेल्या धरतीला थंड करण्यासाठी पाण्याचा मारा करतात. सुखद संध्याकाळ अवतरते तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी वेलींवर सुवासिक सायली, जाई, जुई हसू लागतात. दुपारनंतर येणारी ही सुसहय संध्याकाळ जणू मानवांना सांगत असते, “अरे, जीवनातही अशी चटके देणारी दुपार संपली ना, की रम्य, शांत संध्याकाळ निश्चित अवतरते!”

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा एक रखरखीत दुपार वर निबंध (An awkward afternoon Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा An awkward afternoon Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा एक रखरखीत दुपार वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment