पृथ्वीचं पुस्तक वर निबंध | Book of the Earth Essay in Marathi | Book of the Earth Nibandh

Book of the Earth Essay in Marathi | Book of the Earth Nibandh

आपली पृथ्वी कधी निर्माण झाली? तिच्यात कोणकोणती स्थित्यंतरं घडली? तिचं आणि तिच्यावर राहणार्या सजीवांचं अस्तित्व किती काळ टिकणार आहे? आणि शेवटी पृथ्वीचा अंत कधीकाळी आणि कशारितीनं होणार आहे? हे प्रश्न, मानव विचार करू लागला तेव्हापासूनच त्याला सतावीत आहेत आणि तो या प्रश्नांची अुत्तरंही तेव्हापासूनच शोधतो आहे.

4.5 अब्ज म्हणजे 450 कोटी वर्षांपूर्वी, पृथ्वी निर्माण झाली … पृथ्वीचा जन्म झाला आणि तेव्हापासून ती, सूर्याभोवती फिेरते आहे. सूर्याचा जन्म देखील 500 कोटी वर्षांपूर्वी झाला. म्हणजे या दोघांच्या वयात फारसा फरक नाही.

आपल्या सूर्यमालेतील ग्रह, सूर्यापासून निर्माण झाले, आणि ग्रहांचे चंद्र हे त्या त्या ग्रहांपासून निर्माण झालेत असा समज आहे. म्हणजे सूर्यापासून आपली पृथ्वी आणि पृथ्वीपासून आपला चंद्र निर्माण झाले असा अर्थ निघतो.

आताच्या प्रशांत महासागराच्या ठिकाणी असलेल्या पृथ्वीच्या भागापासून अेक मोठा भाग तुटला, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण नियंत्रणा बाहेर गेला पण सूर्यमालेबाहेर न जाता, काही अंतरावरून, पृथ्वीभोवती फिरू लागला. तोच आपला चंद्रमा. चंद्र अवकाशात गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली, त्यात पाणी भरलं … तोच आजचा प्रशांत महासागर .. पॅसिफिक ओशन अशी संकल्पना आहे.

आता सामान्य माणसाच्याही लक्षात येअील की, जर सूर्यापासून पृथ्वी आणि पृथ्वीपासून चंद्र निर्माण झाला आहे, तर त्यांच्यातील रासायनिक मौलं … मूलद्रव्यं …. केमिकल अेलिमेन्टस .. सारखीच असली पाहिजेत. म्हणजे जसं पृथ्वीवर युरेनियमपर्यंतची 92 मौलं (खरं तर 89 मौलं .. कारण टेक्नीशियम, प्रोमिथियम आणि अॅस्टॅटीन या मौलांचे स्थिर अेकस्थं पृथ्वीवर आढळत नाहीत) आढळतात. पण सूर्यावर तर जेमतेम 60 मौलंच आढळतात आणि अपोलो मिशनने, पृथ्वीवर आणलेल्या, चंद्रावरील खडकांच्या विश्लेशणावरून असं अनुमान निघतं की त्या खडकांची जडणघडण, पृथ्वीवरील खडकांपेक्षा निराळी आहे. थोडक्यात म्हणजे, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांचं वस्तूद्रव्य निराळं आहे.

5 अब्ज पृथ्वीवर्षांपूर्वी, स्वत:भोवती फिरणार्या अेका वस्तूद्रव्याच्या ढगापासून आपला सूर्य, ढगाच्या केन्द्रस्थानी, निर्माण झाला. या ढगात, पूर्वी स्फोट झालेल्या अती प्रकाशमान नवतार्याचे, सुपरनोव्हाचे, अवशेष होते. ढगात असलेली काही अधिक जड मौलं अेकत्रित होअून, त्यांचे ग्रह आणि अुपग्रह बनले. सूर्याभोवती ग्रह आणि ग्रहाभोवती अुपग्रह फिरू लागले. म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र स्वतंत्रपणे घडले आहेत आणि त्यांच्यातील घटकद्रव्यात फरक आहे. सामान्य माणसाला अेव्हढी माहिती पुरेशी आहे असं वाटतं.

पृथ्वीच्या आयुष्यातील 3 प्रमुख कालखंड आहेत.

1. सजीव निर्माण होण्यापूर्वीची पृथ्वी : 4.5 अब्ज वर्षे ते 3.8 अब्ज वर्षे.

हा कालखंड सुमारे 70 कोटी वर्षांचा आहे. पृथ्वी हळूहळू थंड होत गेली. कार्बन, सोनं. चांदी, लोखंड आणि अितर कित्येक धातू, जे वायूरूप अवस्थेत होते ते द्रवरूपात, नंतर घनरूपात आले आणि खाणींच्या स्वरूपात अेकत्रित झाले. धातूंची निसर्गसंपत्ती याच कालखंडात निर्माण झाली. तिच्या पृष्ठभागावर खडकमातीचं कवच (मृदावरण) निर्माण झालं. पाण्याची वाफ थंड होअून द्रवरूप पाणी (जलावरण) निर्माण झालं. ते अुताराकडे वाहत जाअू लागलं आणि नद्या निर्माण झाल्या. खोलगट भागात पाणी साठून महासागर आणि जलाशये निर्माण झाली. त्यावेळी समुद्राचं पाणी गोडं होतं, खारटपणा, जमिनीतील क्षार, नद्यांबरोबर समुद्रात गेल्यामुळे ते काही कोटी वर्षांनी खारट होत गेलं आणि अजूनही त्याचा खारटपणा वाढतोच आहे.

जोरकस पाअूस, महापूर, प्रचंड वादळं, प्रचंड त्सुनामी, अती तीव्र भूकंप, ज्वालामुखींचे अुद्रेक आणि अवकाशातून होणारा अुल्का आणि अशनींचा मारा यामुळे पृथ्वीच्या घटकांची हालचाल, स्थित्यंतरं आणि स्थलांतरं होत असत. याच कालखंडात, सजीव निर्मितीस आवश्यक असलेले कार्बनी रेणूही निर्माण झाले

2. मानव विरहित सजीव सृष्टी असलेली पृथ्वी

सुमारे 3.8 ते 3.5 अब्ज वर्षापूर्वी. समुद्रात आणि मोठ्या जलाशयात, अेकपेशीय वनस्पती आणि प्राणी याचं अस्तित्व जाणवू लागलं. त्यांच्यात असलेला डीअेनअे हा प्रचंड आकार असलेला रेणू कसा आला हे अेक अनुत्तरीत गूढ आहे. त्यामुळेच, सजीवांच्या पेशी, आपलं प्रतिरूप म्हणजे कॉपी करू शकल्या आणि त्यांच्यात असलेल्या आनुवंशिक तत्वाचं पुढच्या पिढीत संक्रमण करू शकल्या. त्यामुळे कोट्यवधी वर्षांच्या कालखंडात, या आनुवंशिक तत्वात अुत्क्रांती होत होत लाखो प्रजाती निर्माण झाल्या. रुशीमुनींनी यालाच 84 लाख योनी असं संबोधिलं. योनी म्हणजे प्रजाती असा अर्थ घ्यावयाचा आहे. 84 लाखाचं गणित मात्र त्यांनी कुठे सांगितलं नाही.

विष्णूचे दशावतार म्हणजे सजीवांची अुत्क्रांतीच आहे असं खात्रीपूर्वक म्हणता येतं. प्रथम जलचर (मत्स्यावतार) नंतर अुभयचर (कूर्मावतार) नंतर केवळ जमिनीवर राहणारे प्राणी (वराह अवतार) नंतर प्राण्यांपासून मानवापर्यंतचे संक्रमण (नृसिंहावतार … अर्धा प्राणी आणि अर्धा मानव). वामनावतार या नंतर आला आहे.

या कालखंडातही पृथ्वीच्या घटकांचं स्थलांतर नैसर्गिक कारणांमुळेच होत असे. सजीव, निसर्गात अुगीचच ढवळाढवळ करीत नसत. वादळात अुन्मळून पडलेली झाडं किंवा मेलेले प्राणी जसेच्या तसेच पडून राहत, निसर्गनियमांनुसारच त्यांची विल्हेवाट लागत असे किंवा पृथ्वीच्या कवचाच्या हालचालीमुळे ते जमिनीखाली, जिवंत असतांनाही, गाडले जात. याच कालखंडात, पृथ्वीच्या कवचाखाली खोलवर, खनिज तेल निर्माण झालं असावं.

याच कालखंडात, पृथ्वीवरील सजीवांचा अितीहास लिहिला गेला. पृथ्वीच्या पुस्तकाची पानं आणि प्रकरणं लिहीली गेली. जीवाश्म निर्माण झाले. सजीवाच्या शरीरांचे अवशेष, सांगाड्यांच्या स्वरूपात, कोट्यवधी वर्षे जतन केले गेले. या कालखंडात पृथ्वीच्या पुस्तकाची पानं, जवळजवळ मूळ स्वरूपात आढळत होती. पण ती वाचायला आणि त्याचा अभ्यास करायला मानव नावाचा प्राणी अुत्क्रांत झाला नव्हता.

३. मानवाच्या अवतरणानंतरची पृथ्वी

वानर प्रजातीचे, (प्रायमेटस्) जीवाश्म आणि अवशेष सापडले. शास्त्रज्ञांनी या सर्वाचा काळजीपूर्वक अभ्यास करून, पृथ्वीच्या पुस्तकाची पानं वाचली, अजूनही ते, ती पानं वाचीत आहेत. सुमारे २२ ते २५ लाख वर्षांपूर्वी, शेपटी नसलेल्या, दोन पायांवर चालणार्‍या कपिंच्या आनुवंशिक तत्वात अुत्क्रांती होअून, या पृथ्वीवर (आफ्रिकेत) आदिमानव अवतरला. जीवाश्म आणि अुत्खननात सापडलेले अवशेष यावरून अितर ठिकाणीही आदिमानवाचं अस्तित्व असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यांना अेप मॅन, जावा मॅन, पिकिंग मॅन वगैरे नावं आहेत. सुमारे ८ लाख वर्षांपूर्वी हिडेलबर्ग मॅन आणि बॉक्सग्रोव्ह मॅन अवतरले. या सर्व आदिमानवांनी आपलं जीवन सुरक्षित आणि सुखदायी करण्यासाठी निसर्गसंपत्तीचा वापर करण्यास सुरूवात केली.

आजचा मानव, होमो सेपियेन, सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी अुत्क्रांत झाला. तेव्हापासून, मानवामुळे, निसर्गातील घटकांचं स्थलांतर प्रचंड प्रमाणात होअू लागलं आणि निसर्गाचा समतोल ढळू लागला. औद्योगिक क्रांतीमुळे तर तो फारच ढासळला आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढ, हरितगृह वायूंचं वाढतं प्रमाण, बदलतं रुतूचक्र, जमीन, पाणी आणि वायूप्रदूषण, कचर्‍याचं वाढतं प्रमाण, रोगराअी वगैरेंच्या समस्या वाढल्या आहेत. औद्योगिक क्रांतीमुळे जीवनमान सुधारलं पण त्यासाठी निसर्गाचा र्‍हास होतो आहे. तो लांबवणं किंवा थांबवणं हे सर्वस्वी आपल्याच हाती आहे. पर्यावरण जागृती, समाजाच्या सर्व थरात झाली पाहिजे.

सध्या, आपण, पृथ्वीच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडीत आहोत.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा पृथ्वीचं पुस्तक वर निबंध (Book of the Earth Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Book of the Earth Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा पृथ्वीचं पुस्तक वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment