Chhatrapati Sambhaji Essay in Marathi | Chhatrapati Sambhaji Nibandh
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठयांच्या गादीवर आलेले हे दुसरे छत्रपती. हौतात्म्यामुळे अजरामर झालेले एक पराक्रमी पुरूष. त्यांचा जन्म छ. शिवाजी महाराज व सईबाई यांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर (पुणे जिल्हा) झाला. त्यांना तीन वडीलबहिणी होत्या. सईबाईंच्या अकाली मृत्यूनंतर (१६५९) त्यांचा सांभाळ आणि शिक्षण आजी जिजाबाईंनी केले. सभासद व चिटणीसांच्या बखरींतून याविषयी तपशील आढळतात.
केशवभट आणि उमाजी पंडित यांनी त्यांना उत्तम शिक्षण दिले. केशवभटांनी त्यांना दंडनीती व प्रयोगरूपरामायण ऐकविले. शिवाय राजपुत्रास आवश्यक असे घोडयावर बसणे, शस्त्रविदया, तालीम, तिरंदाजी वगैरेंचे शिक्षण दिले. छ. संभाजींच्या दानपत्रावरून (२७ ऑगस्ट १६८०) त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. त्यांनी स्वतः लिहून घेतलेल्या तीन भागांतील बुधभूषण या गंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविदया यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. यात राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान. राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे.
याशिवाय गागाभट्टांकडून नीतिपर समयनय हा गंथ (पोथी) त्यांनी लिहून घेतला (१६८१) आणि धर्म कल्पलता हा धर्मशास्त्रावरील गंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला (१६८२). युद्धकलेतील नैपुण्याबद्दल अॅबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजींची प्रशंसा केली आहे. संभाजीराजांचा विवाह पिलाजीराजे शिर्के यांची कन्या राजसबाईबरोबर झाला (१६६५). तिचे नाव येसूबाई ठेवण्यात आले. येसूबाईपासून कन्या भवानीबाई (१६७८) आणि पुत्र शिवाजी (१६८२- छत्रपती शाहू) ही दोन अपत्ये संभाजीराजांना झाली.
चंपा ही त्यांची दुसरी राजपूत पत्नी. तिला माधोसिंग व उधोसिंग हे दोन मुलगे झाले. दुर्गाबाई ही आणखी एक पत्नी असल्याचा उल्लेख उत्तरकालीन कागदपत्रांत येतो. मे १६६६ मध्ये ते छ. शिवाजी महाराजांबरोबर आग्ऱ्यास गेले होते. वयाच्या नवव्या वर्षीच ते मोगली मनसबदार बनले. आग्ऱ्याहून छ. शिवाजी महाराज संभाजीराजांसह बाहेर पडले. पण वाटेत त्यांनी संभाजीराजांना मथुरेत ठेवले होते. पुढे ते २० नोव्हेंबर १६६६ रोजी राजगडास पोहोचले. संभाजीराजे मोगलांची मनसबदारी स्वीकारण्यासाठी १६६७ च्या उत्तरार्धात औरंगाबादला गेले व परतले (५ नोव्हेंबर १६६७). त्यांना इ. स. १६७१-७४ दरम्यान राज्यकारभाराचा अनुभव यावा, म्हणून महाराजांनी महादजी यमाजी हा वाकेनिवीस दिला. १६७२ पासून त्यांनी प्रत्यक्ष लढाईत भाग घेतल्याचा उल्लेख आढळतो.
छ. शिवाजी महाराजांनी कर्नाटकच्या स्वारीवर जाताना (नोव्हेंबर १६७६) संभाजीराजांना शृंगारपूरला राहण्याची अनुज्ञा दिली. कदाचित सावत्र आईच्या सहवासात त्यांना रायगडावर ठेवणे महाराजांना इष्ट वाटले नसावे. तिथे त्यांनी कलीची उपासना केली आणि नंतर कलशाभिषेक करून घेतला (२३ मार्च १६७८). त्यानंतर छ. शिवाजी महाराज एप्रिल-मे १६७८ दरम्यान कर्नाटकच्या स्वारीवरून परतल्यावर त्यांनी राजांना सज्जनगडावर जाण्याचा आदेश दिला (नोव्हेंबर १६७८). तिथून संभाजीराजे एक महिन्याने दिनांक १३ डिसेंबर १६७८ रोजी गडावरून पळून मोगलाईत दिलेरखानाकडे गेले.
अशा रीतीने संभाजीराजे स्वराज्यातून शत्रूपक्षात सामील झाले. दिलेरखानाने याचा फायदा घेऊन मराठी मुलखातील प्रदेश जिंकण्यास सुरूवात केली. दोघांनी काही गड घेतले. त्यात दि. १७ एप्रिल १६७९ रोजी भूपाळगड जिंकला, ७०० माणसे कैद केली. त्यांतील प्रत्येकाचा एक एक हात कापून त्यांना सोडून दिले. त्यानंतर संभाजी व दिलेरखान काही ठाणी घेऊन, मंगळवेढे जिंकून विजापूरच्या बाजूस गेले. त्यांनी जालगिरी, तिकोटा, होनवड या मार्गाने अथणी गाठली. याच सुमारास दिलेरखान व संभाजी यांत मतभेद होऊन राजे गुप्तपणे स्वराज्यात पन्हाळ्यास आले (२१ डिसेंबर १६७९).
छ. शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी (३ एप्रिल १६८०) राजे पन्हाळ्यावर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर (२१ एप्रिल १६८०) सोयराबाई आणि कारभारी मंडळातील काहींनी पुढाकार घेऊन राजारामांचे मंचकारोहण केले आणि छ. संभाजी महाराजांस पकडण्यासाठी हंबीरराव मोहिते व प्रल्हाद निराजी यांस पाठविले. पण तेच संभाजीराजांना पन्हाळ्यावर जाऊन मिळाले. छ. संभाजी महाराजांनी आपल्या विरोधातील हिरोजी फर्जंद, जनार्दनपंत हणमंते, मोरोपंत पिंगळे इत्यादींना कैदेत टाकले, तसेच अण्णाजी दत्तो व बाळाजी आवजी यांना अटक केली.
१८ जून १६८० रोजी ते रायगडास पोहोचले आणि जुलैमध्ये त्यांनी स्वतःस मंचकारोहण करून पुढे १६ जानेवारी १६८१ रोजी रायगड येथे विधिवत राज्याभिषेक करून घेतला. त्यावेळी मोरोपंत आदींना सोडले. पण थोड्याच दिवसांत मोरोपंत मरण पावले, तेव्हा त्यांचा मुलगा निळोपंत यास मुख्य प्रधानपदी नेमले. नंतर काही दिवसांनी रायगडावर संभाजीराजांविरूद्ध आणखी एक कट उघडकीस आल्याने त्यांनी अण्णाजी दत्तो व बाळाजी आवजी, सोमाजी दत्तो आणि हिरोजी फर्जंद यांना परळीखाली कैद करून ठार मारले. याप्रमाणे आणखीही काही लोक मारले व कर्नाटकात शामजी नाईक पुंडे यास अटक केली.
पूर्वीच्या कारभारी मंडळातील अनेक मंत्र्यांविषयी त्यांच्या मनात संशय होता, तेव्हा त्यांनी कवी कलश या कनौजी बाह्मणास जवळ करून त्यास छंदोगामात्य हे पद दिले, पुढे कुलअखत्यारही बनविले. राज्यकारभारातही त्याचा सल्ला ते प्रमाण मानीत होते. कवी कलशाचा संभाजीराजांवर मोठा प्रभाव पडलेला दिसतो. त्याच्या मर्जीनुसार ते अधिकारी बदलत किंवा नेमत असत आणि पुढे पुढे ते तांत्रिक साधनेच्या मागेही लागले असावेत, असे काहींचे म्हणणे आहे. सोयराबाईही या सुमारास मरण पावल्या असाव्यात. त्यांच्या मृत्यूविषयी इतिहासतज्ज्ञांत मतैक्य नाही.
रायगडावर स्थिरस्थावर झाल्यानंतर संभाजीराजांचा बहुतेक काळ शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्यातच गेलेला दिसतो. त्यांची एकूण कारकीर्द नऊ वर्षांची. त्या सबंध काळात सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, वाडीकर सावंत, दळवी यांच्याशी त्यांना मुकाबला करावा लागला. उत्तरेतील अत्यंत प्रबळ शत्रू औरंगजेब याच्याशी मुकाबला करीत असतानाच त्यांचा अत्यंत कूर रीत्या शेवट झाला.
सुरूवातीच्या काळात काही महिन्यांनी औरंगजेबाचा मुलगा अकबर पित्याविरूद्ध बंड करून दुर्गादास राठोडच्या मदतीने संभाजीराजांच्या आश्रयास आला (१३ नोव्हेंबर १६८१). त्याने राजांबरोबर काही मोहिमांत भाग घेतला. पण औरंगजेबाच्या दक्षिणेतील तीव्र प्रतिकारामुळे तो फेबुवारी १६८७ मध्ये इराणकडे रवाना झाला. राजांचे अकबराशी संबंध अखेरपर्यंत औपचारिकच होते. त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
छ. शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसांत सिद्दी आणि इंग्रज यांच्याशी मराठयांनी सामान्यतः तटस्थतेचे संबंध ठेविले होते. संभाजीराजांनी १६८० च्या नोव्हेंबरात सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी आवजी पंडित या धूर्त वकिलास इंग्रजांशी बोलणी करण्याकरिता मुंबईला पाठविले. त्याने पूर्वीचा तह पाळावा, नाही तर राजे इंग्रजांविरूद्ध युद्ध पुकारतील, असे सांगितले. त्यावेळी सिद्दीने आपले आरमार बंदराबाहेर नांगरले. परंतु नंतर सिद्दीने मराठयांना न जुमानता चाचेगिरी व लूटमार आणि इंग्रजांच्या साहाय्याने मराठयांच्या मुलखाची नासधूस करण्यास सुरूवात केली, तेव्हा संभाजीराजांनी सिद्दीच्याच उंदेरीवर हल्ले चढविले (जुलै १६८१). तसेच इंग्रजांच्या संमतीने हे सारे चालले आहे, असे समजून त्यांची जहाजे ताब्यात घेऊन त्यांना दम भरला. त्यातूनच पुढे १६८१ ची जंजिऱ्याची मोहीम निर्माण झाली. या वेढयात राजांनी स्वतः पुढाकार घेतला होता. खाडी भरून काढण्यासाठी अचाट कल्पना लढवून सैन्याला मार्ग सुकर व्हावा म्हणून त्यांनी ६६९ चौ. मी. रूंद आणि सु. २७ मी. लांब जंजिऱ्याची खाडी दगड, लाकूड, कापसाच्या गाठी यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु खवळलेल्या समुद्रामुळे तो निष्फळ ठरला, तरीसुद्धा हा अयशस्वी वेढा पुढे आठ महिने चालला.
१६८२ च्या फेबुवारीच्या अखेरीस राजे आणि अकबर जंजिऱ्याच्या आघाडीवरून माघारी आले. समुद्रातील या लढाईमुळे संभाजीराजांनी आपले नौदल आणि आरमार मोठया प्रमाणात वाढविले. त्यातूनच पुढे प्रसिद्ध आंगे घराण्याचा उदय झाला. १६८५ मध्ये पुन्हा उंदेरी घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे दंडाराजपुरी घेण्याचा एक अयशस्वी प्रयत्नही झाला. सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांवर दडपण आणले. परंतु यातही त्यांना फारसे यश आले नाही. तथापि संभाजीराजांनी खंदेरी इंग्रजास देण्याचा विचार मान्य केला नाही आणि सिद्दीलाही शेवटपर्यंत खंदेरी, पद्मदुर्ग, कुलाबा जिंकता आले नाही.
छ. संभाजी महाराज राज्यावर आल्यानंतर पोर्तुगीजांनी स्नेहाचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. अकबराचे पोर्तुगीजांशी असलेल्या मैत्रीच्या संबंधांमुळे तहाच्या वाटाघाटीत त्यास मध्यस्थ म्हणून घेतले. परंतु संभाजी-राजांनी १६८२ मध्ये अंजदीव बेटावर स्वारी केली. त्यामुळे पोर्तुगीज आणि संभाजीराजे यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. त्यातच १६८२ पासून पोर्तुगीजांनी मोगलांना सर्वतोपरी मदत देण्यास सुरूवात केली होती आणि दोघांच्या संगनमताने संभाजीराजांस पराभूत करण्याचे कारस्थान शिजू लागले. १६८२ च्या जून-जुलैमध्ये संभाजीराजांनी चौल (चेऊल) व रेवदंडयास वेढा दिला, बरेच दिवस तो चालला. संभाजीराजांनी उत्तर कोकणातील दोन किल्ले जिंकून घेतले (१६८३), तसेच जुनी साष्टी व बारदेस येथेही चढाई केली. त्यांनी चौलचा वेढा उठवावा, म्हणूनच पोर्तुगीजांनी फोंडयावर हल्ला केला.
१६८३ च्या डिसेंबरमध्ये मराठयांनी पोर्तुगीजांची अनेक गावे घेऊन फोंडा लढविला. सहा महिन्यांनंतर चौलचा वेढा उठविला. फोंडयाच्या लढाईत येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी यांनी मोठा पराकम गाजविला. शेवटी दक्षिणेत मोठी मोगली फौज घेऊन शाहआलम येत आहे, ही बातमी येताच १६८४ च्या सुरूवातीस फोंडे येथे पोर्तुगीजांशी तह केला. या तहाच्या वाटा-घाटीत कवी कलशाची भूमिका मुख्य होती आणि अकबर यास मध्यस्थ नेमले होते. दरम्यान शाहआलमच्या समाचारासाठी ते गोव्यातून गव्हर्नरने माघारी आले. तत्पूर्वी औरंगजेबाचा वकील शेख महंमद हा गोव्यात पोहोचला होता. त्याने पोर्तुगीजांनी संभाजीविरूद्ध युद्ध पुकारावे, अशी बादशहाची इच्छा असल्याचे सांगितले. तेथील गोव्याच्या गव्हर्नरने (विजरई) इतर सर्व अटी मान्य केल्या. परंतु संभाजीराजांशी सलोखा असल्यामुळे मराठयांशी युद्ध करण्याचे नाकारले.
प्रामुख्याने मराठी राज्य बुडवावे तसेच आदिलशाही व कुत्बशाही पादाकांत करावी अशा निश्चयाने आणि बंडखोरी करून संभाजीच्या आश्रयास आलेल्या आपल्या अकबर या मुलाचा सूड घ्यावा या उद्देशाने औरंगजेब दक्षिण हिंदुस्थानात औरंगाबादेस आला (१६८२). तिथे त्याला आदिलशाही व कुत्बशाहीचे अनेक नामवंत सरदार जाऊन भेटले.
मोगलांनी मराठयांचा पाडाव करण्यासाठी आदिलशाहाला सैन्याच्या खर्चासाठी नऊ लाख रूपये दिले. परंतु मराठयांचे राज्य जिंकण्यास विजापूरकरांचा फारसा उपयोग होत नाही, हे लक्षात येताच त्याने शिकंदर आदिलशाहकडे एप्रिल १६८४ मध्ये फर्माने पाठविली. त्यात प्रमुख अट, ‘संभाजीची मित्रता व सख्य बाह्यातकारी व अंतर्यामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजींचा निर्मूळ फडशा पाडण्याकरिता विचार करणे ’ ही होती. पण मराठयांविरूद्धच्या मोहिमेत मोगलांना सर्व आघाडयांवर अपयश येत होते. संभाजी, शिकंदर आदिलशाह आणि अबुल हसन कुत्बशहा यांत एकजूट होईल, असा संशय औरंगजेबास आला, म्हणून त्याने आदिलशाहीवर ऑक्टोबर १६८४ मध्ये स्वारी केली.
या चढाईचा प्रतिकार करण्यासाठी दक्षिणेतील तीन सत्ताधीश एकत्र आले. संभाजीराजे, आदिलशाह आणि कुत्बशहा यांचा गट तयार होऊन या त्रिकूटाने मोगलांशी सामना देण्याची तयारी केली. संभाजीराजांनी मार्च १६८५ मध्ये मदत पाठविली. डिसेंबर महिन्यात हंबीरराव मोहिते सैन्यासह विजापुरात दाखल झाले. संभाजीराजे व गोवळकोंडयाचा सुलतान हे संकट सर्व दक्षिणीयांवर आहे, असे समजून वागत होते. दोघेही आदिलशाही सुलतानास मदत करीत होते.
औरंगजेबाने कुत्बशहास आक्रमणाची धमकी दिली आणि काही अटी मान्य करावयास लावल्या. त्यांची पूर्तता झाली नाही, हे पाहून आक्रमण केले. मादण्णा व आकण्णा या दोन विश्वासू , पराक्रमी व कार्यक्षम मंत्र्यांचा विश्वासघाताने खून झाला. परिणामतः औरंगजेबाने १२ सप्टेंबर १६८६ रोजी आदिलशाही संपुष्टात आणली आणि त्यानंतर २२ सप्टेंबर १६८७ रोजी गोवळकोंडा हस्तगत करून कुत्बशाही राज्याचा शेवट केला आणि आपली सर्व शक्ती संभाजीराजांवर केंद्रित केली. संभाजीराजांची उभी कारकीर्द औरंगजेबाविरूद्ध लढा देण्यात गेली. प्रारंभी संभाजीराजांच्या फौजांनी बृहाणपूर लुटले. औरंगाबादच्या सभोवतालचा मुलूख लुटला (१६८१). त्याच सुमारास दक्षिण कोकणात शाहआलम आणि तळकोकणात हसन अलीखान उतरले. शाहआलमचा पराभव मराठयांनी केला. हसन अलीखान तळकोकणातून कल्याण-भिवंडीकडे गेला. रणमस्तखान कोकणात उतरला, तेव्हा संभाजीराजांनी त्यास प्रतिकार केला.
१६८३ मध्ये मोगलांनी साल्हेर-मुल्हेर घेतले आणि रामसेज व त्रिंबकगडास वेढे दिले. १६८२ मध्ये खानजहानबहाद्दूराने सातारा प्रांताची मोहीम काढली. १६८५ मध्ये मराठयांनी धरणगाव लुटले आणि वऱ्हाड प्रांतात धुमाकूळ घातला. मोगलांच्या या आक्रमणाचा संभाजीराजांनी चांगलाच प्रतिकार केला. मोगली फौजांनी कोल्हापूर, मिरज, पन्हाळा या भागांत आक्रमण करण्यास सुरूवात केली (१६८६). उलट संभाजीराजांनी गोवळकोंडेकर आणि विजापूरकर यांना मोगलांविरूद्ध वेळोवेळी मदत केली. वाईजवळ हंबीरराव मोहिते आणि सर्जाखान यांत लढाई होऊन त्यात हंबीरराव मरण पावले (१६८७). रामसेज, साल्हेर, माहुली इ. अभेदय किल्ले औरंगजेबाने लाच देऊन हस्तगत केले. तसेच दळवी-देसायांप्रमाणेच संभाजीराजांकडे असलेल्या नोकरांना, अधिकाऱ्यांना जहागिरी, मन्सब यांचे आमिष दाखवून त्यांना आपल्याकडे वळवून घेतले, सेवेतही ठेवले. या फितुरांमुळेच संभाजींचा शेवट झाला.
१६८७ ते ८९ पर्यंतच्या संभाजीराजांच्या हालचालींसंबंधी विशेष तपशील मिळत नाही. तथापि या काळात मोगलांनी सर्व बाजूंनी संभाजीराजांस वेढले असले. तरी सातारा विभागातील सातारा, परळी, निंब, चंदनवंदन, कऱ्हाड, माजगाव, मसूर हे, तर दक्षिण कोकणातील संगमेश्वर, राजापूर, पन्हाळा, मलकापूर, खेळणा, शिरोळे, फोंडे, कोपल हे आणि कुलाबा, खंदेरी, राजकोट, सागरगड, पद्मदुर्ग, चौल हे उत्तर कोकणातील प्रदेश १६८९ च्या सुरूवातीपर्यंत मराठयांकडेच होते. शेख मुकर्रबखानाने संभाजीराजांस बेसावध स्थितीत किरकोळ चकमकीनंतर संगमेश्वरी कैद केले आणि तुळापूरजवळील वढू येथे औरंगजेबाने त्यांचा निर्घृणपणे वध केला.
छ. शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजीराजांनी अष्टप्रधानांव्दारे राज्यव्यवस्था चालू ठेवल्याचे दिसते. मात्र कवी कलशाची त्यांनी छंदोगामात्य या नवीन पदावर नियुक्ती केली. वतनाचे निवाडे, किल्ल्यांची निगराणी तसेच जमिनीचे महसूल पूर्वापार पद्धतीने चालत होते, तेच त्यांनी पुढे चालू ठेवले. आयात-निर्यात कर तसेच खंडणी व चौथाईची वसुली व्यवस्थितपणे झालेली दिसते. १६८६-८७ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला, तेव्हा त्यांनी पुनर्वसनासाठी कौलनामे दिले. व्यापाऱ्यांना सवलती देऊन महसुलात वाढ करण्याचा प्रयत्न केला. सैनिकी व्यवस्थेत घोडदल, पायदळ, तोफखाना तसेच समुद्रावरील शत्रूशी लढण्यासाठी कार्यक्षम नौदल निर्माण केले. छ. संभाजी महाराजांकडे धैर्य, शौर्य आणि धडाडी हे सेनापतीला आवश्यक सर्व गुण होते.
काही लढायांतील त्यांचे नेतृत्व विलक्षण चापल्याचे आणि प्रशंसनीय आहे. जंजिरा, चौल, तारापूर, फोंडा, सांतु इस्तेव्हंव, खेळणा, बाणावर व श्रीरंगपटण या आघाड्यांवर आणि १६८८ च्या शिर्क्यांबरोबर झालेल्या युद्धात ते जातीने हजर होते. तथापि अकबराबरोबरचे त्यांचे संबंध, गोव्यावरील स्वारीतून अचानक माघार आणि ज्येष्ठ व श्रेष्ठ मातब्बर प्रधान व सरकारकून यांबरोबरचे वर्तन यांत छ. शिवाजी महाराजांचा दूरदर्शीपणा व मुत्सद्देगिरी दिसत नाही, असे काही इतिहासकारांचे मत आहे. त्यामुळे एकाच वेळी मोगल, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी यांच्याबरोबर त्यांना एकाकी लढा दयावा लागला. परिणामतः मराठयांचे राज्य संकुचित झाले आणि शाहू , येसूबाई व अन्य नात्यागोत्यांतील लोकांना पुढील अनेक वर्षे मोगली तुरूंगवास भोगावा लागला.
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा छत्रपति संभाजी वर निबंध (Chhatrapati Sambhaji Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा Chhatrapati Sambhaji Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा छत्रपति संभाजी वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.