शेतकरी वर निबंध | Farmers Essay in Marathi | Farmers Nibandh

Farmers Essay in Marathi | Farmers Nibandh

आपला भारत देश हा ऐंशी टक्के कृषिप्रधान आहे. भरपूर लोकांचा शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. जर आपल्या या शेतकरी बांधवाने त्याच्या शेतात काही पिकवले नाही तर आपण काय खाणार? आपण कसे जगणार? पण त्याच्या या कष्टाला आणि मेहनतीला म्हणजेच त्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही. त्याला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. जसे की कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ तर कधी वादळ यामुळे शेतीचे बरेच नुकसान होते. त्यामुळेच तर आपला शेतकरी बांधव हा आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. पण यावर आपण सर्वांनी मिळून काहीतरी केले पाहिजे.

आपला हा शेतकरी बांधव रात्रंदिवस शेतात राबतो. म्हणूनच तर ‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश की धरती’ यांसारख्या ओळी आपल्या ओठांवर सहज येतात. ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’, ‘जिथे राबती हात तेथे हरी’ अशी शेतीच्या महतीची वचने आपण नेहमी ऐकतो, बोलतो व कौतुकाने लिहितो. परंतु शाळेतील परीक्षांमधील गुणवंताच्या तोंडून मी डॉक्टर, मी इंजिनिअर होणार अशा महत्वाकांक्षा बाहेर पडतात. पण यापैकी कोणीच ‘मी एक आदर्श शेतकरी होणार’ आणि मी माझे जीवन शेतकामामध्ये झोकून देणार असे कोणीच म्हणत नाही. शेतकरी म्हणजे दुय्यम समाज असा दृष्टिकोन आजच्या या नवीन पिढीचा झाला आहे.

‘जय जवान जय किसान’ म्हणून आपण शेतकऱ्यांना गौरवितो. पण त्या शेतकऱ्यांच्या जीवनाचा त्यांच्या अडचणींचा आपण कधीच विचार करत नाही. आपल्या या मातृभूमीसाठी, देशासाठी अन्नधान्य पिकवणारा, सुजलाम सुफलाम धरती बनवणारा हा शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतो. परंतु दोन वेळचे पोटभर अन्नही नीट त्याच्या वाट्याला येत नाही आणि ऐशआरामाचे जीवनही तो जगू शकत नाही.

शेतमालाला मिळेल तो दर, सरकारचे वेगवेगळे कर, कायदे यामुळे त्याच्या एकूण उत्पन्नाच्या दहा टक्के उत्पन्नही त्याला मिळत नाही. परंतु या सर्व शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील नफ्याला चटावलेला, सर्व नियम, कायदेकानून खिशात घेऊन फिरणारा आणि पैशाने लालची झालेला व्यापारी या गरीब शेतकऱ्याला पिळत असतो नागवत असतो. अंगमेहनत करूनही त्याच्या कष्टाला मोल राहत नाही असा हा असहाय्य शेतकरी एकदम खचलेला असतो. व्यापारी, दलाल मात्र कष्ट न करताही पैसे लुबाडत असतात आणि शेतकऱ्याचा माल कमीत कमी किमतीत खरेदी करून आपल्या शेतकरी बांधवाला नाराज करतात. त्यामुळे त्याच्या कष्टाला किंमत राहत नाही.

स्वातंत्रोत्तर काळात सरकारने अनेक सवलती देऊ केल्या. आयकरातून शेती उत्पन्नाला सूट दिली. याशिवाय वेळोवेळी काही कारणांसाठी कर्जे दिली आणि प्रसंगी ती माफही केली. वीजदरात कपात केली असे असूनही शेतकरी अजूनही त्याच परिस्थितीत राहिला. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करू लागला कारण शेती करण्याच्या जुन्या, परंपरागत चालत आलेल्या पद्धती आणि काही अंधश्रद्धाळू पद्धती यांमुळे जास्तीत जास्त नफा मिळत नसल्याने कर्ज फेडणे मुश्किल होते. शेतकऱ्याला शेतीपासून जास्त उत्पादन घेण्यासाठी चांगले बी-बियाणे, खते, यंत्रणा आणि शेतीचे व्यवस्थित नियोजन आवश्यक असते. सहकार्याचा अभाव, तसेच भांडवल नसल्यामुळे अज्ञानी, त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी निसर्गापुढे मात करू शकत नाही.

शेती पिकवण्यासाठी आणि जास्त फायदा मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान नाही. ‘भारत हा खेड्यांचा देश आहे’ किंवा ऐंशी टक्के भारतातील लोक खेड्यात राहतात. ‘खेड्यांकडे चला’ म्हणजेच खेड्यांचा विकास करा असे गांधीजी म्हणत असत.स्वातंत्र्यानंतरच्या काळात शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे व आधुनिक तंत्रज्ञानामुळे समाजजीवनाचा पूर्ण कायापालट झाला आहे. धरणे, तलाव, कालवे, बंधारे, बी-बियाणे, शेतीची नवनवीन अवजारे, रासायनिक खते यामुळे शेतीक्षेत्रात बरीच मोठी क्रांती झाली आहे. वेगवेगळ्या सिंचनाच्या पद्धती विकसित झाल्या आहेत, जसे की ठिबकसिंचन, तुषारसिंचन त्यामुळे शेतीला योग्य प्रमाणात पाणी मिळते आणि पाणीबचत सुद्धा होते. दोन बैलांना धरून नांगर चालविणाऱ्या शेतकऱ्याच्या जागी शर्ट पॅंट घालून ट्रॅक्टर चालविणारा आपला शेतकरी बांधव दिसू लागला आहे.

आधुनिक शेती शिक्षणासाठी अनेक कृषी विद्यापीठे सज्ज झाली आहेत. त्यामुळे शेतकरी तांदूळ, गहू, ज्वारी या पिकांप्रमाणेच ऊस, द्राक्ष, सूर्यफूल यांची शेती करण्याचे प्रमाण आज वाढलेले आहे. शेतीप्रमाणेच आंबा, काजू, नारळ यासारखी फळे व दूध, मासे यांचे उत्पादन वाढविण्याकडे शेतकरी वाळू लागले आहेत. सर्वच प्रसारमाध्यमांवर जसे की दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रात आणि आकाशवाणी यांवर शेतीविषयक जागृतीची माहिती सांगतात, तसेच कार्यक्रम दाखवले जातात. त्यामुळेच हे शेतीविषयक जनजागृतीचे कार्यक्रम पाहून शेतकरी आता आधुनिक पद्धतीने आणि नवीन यंत्रे वापरून शेती करू लागला आहे. त्यामुळे पिकाचे प्रमाण वाढले आहे आणि मनुष्यबळसुद्धा जास्त लागत नाही. तसेच शेतकऱ्याचे शारीरिक कष्ट कमी झाले आहे.

आमची शेती आमची माती, पिकवू येथे माणिक मोती

या जिद्दीने आज भारतीय शेतकरी प्रगती करत आहे. सरकारी पातळीवर जाहीर होणाऱ्या विविध सुविधांच्या कार्यवाहीतून भारतीय शेती व्यवसाय संपन्न करण्याचा प्रयत्न एकीकडे चालला असतानाच, नैसर्गिक प्रकोपालाही शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे. निसर्गाची ही अवकृपा टाळण्यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. तरीही ‘शेतकरी’ व्हावे असे फारच थोड्या लोकांना वाटते. पुस्तकी शिक्षणाच्या पदव्या व शहरी साधनांचे सुखी जीवन यांचे बहुतांश बऱ्याच लोकांना भारी आकर्षण वाटते. ‘भाकरी खाणे’ गरिबीचे लक्षण तर ‘ब्रेड खाणे’ श्रीमंतीचे. हल्ली शेतकी महाविद्यालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतात. ही एक चांगलीच गोष्ट आहे. आपल्या या शेतकऱ्याचे जीवन सुखी होण्यासाठी आपण सर्वांनीच शेतीवर मनापासून प्रेम केले पाहिजे आणि आपल्या या शेतकरी बांधवांचे दुःख जाणून घेतले पाहिजे कारण ‘शेतकरी सुखी तर जग सुखी’. शेतकऱ्याप्रमाणेच आपणही ही धरती सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आपल्या परिसरात प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे. म्हणजेच प्रदूषण रोखण्यास मदत होईल आणि जमिनीची धूपही थांबेल.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा शेतकरी वर निबंध (Farmers Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Farmers Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप
लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा शेतकरी पर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment