गोपाळ गणेश आगरकर वर निबंध | Gopal Ganesh Agarkar Essay in Marathi | Gopal Ganesh Agarkar Nibandh

Gopal Ganesh Agarkar Essay in Marathi | Gopal Ganesh Agarkar Nibandh

“एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यात झाला. हालअपेष्टांना तोंड देत कराड, रत्‍नागिरी, अकोला आणि पुणे येथे राहून ते एम्‌. ए. झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यात निर्माण केलेल्या जहाल विचारांच्या राष्ट्रवादी पंथास ते लोकमान्य टिळकांसह जाऊन मिळाले. लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी या तिघांनी पुण्यात ‘न्यू इंग्‍लिश स्कूल’ स्थापन केले (१८८०), तसेच केसरी आणि मराठा (इंग्रजी) ही पत्रे चालू केली (१८८१). न्यू इंग्‍लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले. त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून परिणामकारक लेखन आणि कुशल संपादन यांच्या जोरावर अल्पावधीतच केसरीला लोकप्रियता प्राप्त करून दिली. न्यू इंग्‍लिश स्कूलच्या चालकांनी स्थापन केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ च्या ‘फर्ग्युसन महाविद्यालया’चे प्राचार्य (१८९२) म्हणूनही त्यांनी काम केले.

महाविद्यालयीन जीवनातच जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संस्कारित झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झालेला होता. याच दृष्टिकोनातून तत्कालीन समाजाची पुनर्घटना करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखांतून हीच भूमिका व्यक्त होऊ लागली. सामाजिक प्रश्नांच्या जाणिवेपेक्षा राजकीय प्रश्नांची जाणीव अधिक तीव्र असली पाहिजे, असे केसरी व मराठाच्या चालकमंडळींस वाटत असल्यामुळे, आगरकरांचा वैचारिक कोंडमारा होऊ लागला. परिणामत: ते केसरीतून बाहेर पडले (१८८७) आणि आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादन-प्रसारासाठी सुधारक हे पत्र त्यांनी काढले (१८८८). त्यात राजकीय व अर्थशास्त्रविषयक लेखही येत.

बुद्धिवादी दृष्टिकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानीत नसल्यामुळे समाजसुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते. नीतिमान आणि सदाचरणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म यांचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती. परोपकारादी सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले, अशी त्यांची भूमिका होती. बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता आणि मानवतावाद या चतु:सूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे. साहजिकच, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता आणि चातुर्वर्ण्य, ⇨जातिसंस्था, ⇨अस्पृश्यता, ⇨ बालविवाह इ. गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या. मनुष्यजातीचे ऐहिक सुखवर्धन हेच त्यांचे ध्येय बनले होते. तथापि निव्वळ इंद्रियसुखालाच ऐहिक सुख मानण्याइतपत त्यांची दृष्टी संकुचित नव्हती. नीतिमान आणि संयमी जीवनामुळे मनाला लाभणारे समाधानही या ऐहिक सुखात त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिस्वातंत्र्यामुळे स्वार्थ आणि स्वैराचार फैलावण्याऐवजी समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहितचिंतकच होतील, असे त्यांना वाटे. उलट व्यक्तिस्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती. परंपरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल, हे ते मान्य करीत. मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी, असे ते म्हणत. अशा रूढी आणि परंपरा स्वखुषीने सोडून द्यावयास समाज तयार नसेल, तर त्या कायद्याने नाहीशा कराव्या, असे त्यांचे मत होते.

त्यांचे हे विचार तत्कालीन अंधश्रद्ध सामान्यांना समजले नाहीतच. तथापि टिळकांसारख्या सुशिक्षित आणि चिंतनशील व्यक्तींचाही त्यांना पाठिंवा मिळू शकला नाही. जनतेचे लक्ष समाजक्रांतीवर केंद्रित करून त्यात तिची शक्ती वाया घालवण्यापेक्षा आधी राजकीय स्वातंत्र्यासाठी तिचा उपयोग करून घ्‍यावा, तसेच सामाजिक रूढींच्या प्रश्नावर लोकांची मने दुखवून राजकीय चळवळीत फूट पाडू नये, असे टिळकांना वाटे. ईश्वर आणि धर्म यांच्याविषयीचे आगरकरांचे विचार रा. गो. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांसारख्या सुधारक व्यक्तींनाही पटत नसत. सुधारकातील लेखांविरुद्ध चहुबाजूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. खुनाच्या धमक्या, प्रेतयात्रा काढणे इ. प्रकार झाले; परंतु ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’, या भूमिकेतून सामाजिक सुधारणांचा कडवा पुरस्कार त्यांनी आमरण चालू ठेवला. सुधारकातील लेखांतून त्यांचे समाजजीवनाच्या विविध अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन प्रत्ययास येते. स्त्रियांचा पोषाख, विधवांचे केशवपन, सोवळे-ओवळे, अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार, हजामत, जोडे इ. विषय जसे त्यांत आहेत, तसेच देवतांची उत्पत्ती, मूर्तिपूजा, आत्म्याची मरणोत्तर स्थिती इत्यादींसारखे तात्त्विक आणि धर्माशी निकटचा संबंध असलेले विषयही आहेत. सामाजिक सुधारणा आणि कायदा यांचे संबंध काय असावेत, यासंबंधीची आपली भूमिका मांडण्यासाठी आणि समाजहितकारक कायद्यांच्या जोरदार पुरस्कारासाठी काही लेख लिहिले गेले आहेत तर काही लेखांतून सामाजिक गुलामगिरीने जखडून गेलेल्या स्त्रियांच्या शिक्षणादी समस्यांविषयी मूलगामी विचार आलेले आहेत.

समाजचिंतन हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव असला, तरी राजकीय विचारांच्या जहालपणात ते टिळकांच्या बरोबरच होते. राजकीय हक्क आणि राजकीय स्वातंत्र्य यांची तीव्र जाणीव त्यांच्या लेखांतून स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली आहे. चिपळूणकर निवर्तल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय विचारजागृती घडवून आणण्याचे काम केसरीतून बाहेर पडेपर्यंत त्यांनीच केले.

आपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंधसाहित्यात त्यांनी मोलाची भर घातली, पल्लेदार वाक्ये, मुद्देसूद प्रतिपादन, अन्वर्थक अलंकार आणि प्रासंगिक नर्मविनोद ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये. त्यांच्या ‘कवि, काव्य, काव्यरति’ आणि ‘शेक्सपिअर, भवभूति व कालिदास’ यांसारख्या साहित्यविषयक निबंधांनी आजच्या काही टीकाकारांचे लक्ष वेधून घेतले असून त्यांनी आगरकरांना साहित्यशास्त्रातील काही मूलभूत तत्त्वांचा शास्त्रीय पद्धतीने विचार करणारे विचारवंत मानले आहे. काव्य आणि संवेदना यांचा विशेष संबंध, काव्यातील सत्य आणि शास्त्रीय सत्य, काव्यातील करुणरस, कविमन आणि काव्यनिर्मितिप्रक्रिया इत्यादींसंबंधीचे त्यांचे विचार या दृष्टीने कक्षणीय ठरतात. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत: विकारविलसितअथवाशेक्सपीअरकृत हॉम्लेट नाटकाचे भाषांतर (१८८३), डोंगरीच्या तुरुंगांत आमचे १०१ दिवस (१८८२), शेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र (१९०७),वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण.

विकारविलासिताच्या प्रदीर्घ प्रस्तावंनेत परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतरे कशी करावी, यासंबंधीची मते त्यांनी मांडली आहेत. ‘कोल्हापूर प्रकरणा’वरून १८८२त डोंगरी येथे टिळकांसह कारावास भोगत असतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी डोंगरीच्या तुरुंगांत मध्ये खेळकर आणि विनोदी शैलीत सांगितले आहेत. मराठी वाक्याचे निरनिराळे अवयव आणि त्यांचे परस्परसंबंध यांचा तपशीलवार विचार त्यांनीच मराठीत प्रथम आणला. त्यांचे केसरीतील निवडक निबंध (१८८७) आणि सुधारकातील वेचक लेख (निबंधसंग्रह १८९५) प्रसिद्ध झाले आहेत. साहित्य अकादेमीनेही त्यांचे काही लेख प्रसिद्ध केले आहेत. दम्याच्या विकाराने पुणे येथे ते निधन पावले.”

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा गोपाळ गणेश आगरकर वर निबंध (Gopal Ganesh Agarkar Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Gopal Ganesh Agarkar Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा गोपाळ गणेश आगरकर वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment