I am talking about Raigad Essay in Marathi |I am talking about Raigad Nibandh
किल्ले रायगडाच्या सहवासात आज कित्येक वर्षांनी माझी मनीषा पूर्ण होत आहे. शिवरायांच्या किल्ले रायगडाच्या सहवासात आज मी हिंडत आहे-अगदी स्वच्छंदपणे. बालपणापासून शिवरायांविषयी मला विलक्षण ओढ. महाराष्ट्रापासून दूर अशा विदर्भभूमीत मी मोठा झालो; पण मला बाळकडू मिळाले ते शिवरायांच्या कथांतून. वाचण्याची कला अवगत झाली आणि साऱ्या कथांतील शिवाजी वाचून टाकला. शालेय जीवनात शिवाजीमहाराजांशी माझी घनिष्ठ ओळख झाली ती अभ्यासक्रमातील पुस्तकांमुळे आणि त्याहीपेक्षा शिवचरित्रावर निर्माण झालेल्या ललित साहित्यातून. ‘श्रीमान योगी’ने मला एक आगळा स्वामी दाखविला; तर ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मध्ये मला एक मुत्सद्दी राज्यकर्ता पण दुःखी पिता भेटला. या साऱ्या पुस्तकांनी एकच कामगिरी केली आणि ती म्हणजे शिवरायांविषयीची विलक्षण ओढ माझ्या मनात निर्माण झाली. पुण्याला जावे, लाल महाल पाहावा, सिंहगड चढावा, पन्हाळ्यावर चढाई करावी, रायगडाला कवटाळावे अशी मला तीव्र इच्छा होती. त्यामुळे अनुकूल संधी मिळताच मी रायगडावर धाव घेतली. माझ्याबरोबर माझा एक मित्र होता, त्यालाही रायगडाच्या प्रेमाने पछाडले होते.
आगगाडी व एस. टी. चा प्रवास संपवून आम्ही रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आणि काय गंमत! तेथील प्रत्येक दगड, ती पायवाट सारे मला ओळखीचे वाटू लागले. उलट शासनाने बांधून काढलेल्या पायऱ्याच मला अनोळखी वाटू लागल्या. रात्री आम्ही रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडगावी मुक्काम केला. आपल्या वार्धक्यात जिजामाता येथेच मुक्काम करीत असल्याचे स्मरले. रायगडावरील राज्याभिषेकप्रसंगी राजांनी येथूनच मासाहेबांना गडावर नेले होते, याची आठवण होऊन मन भरून आले.
भल्या पहाटे आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. मुद्दाम जुनी पायवाट निवडली. या पायवाटेने राजे कितीतरी वेळा गड चढले असावेत, या विचाराने मन भारावले. इतर वेळी राजे घोड्यावरून चढले असतील; पण आग्याहून सुटून गोसाव्याच्या वेषात ते जेव्हा गडावर आले तेव्हा ते हीच पायवाट चढून गेले असावेत. महाराष्ट्राच्या स्वराज्यनिर्मितीत या पायवाटेचेही स्थान महत्त्वाचे आहे. स्वराज्याचे अनेक मनसुबे तिच्या कानांवर पडले असतील.
रायगडाचे स्थान खरोखरीच इतके रमणीय आहे की, कुणीही त्याच्या प्रेमात पडावे. गडाची चढण संपली आणि आम्हांला तहान लागल्याची जाणीव झाली. थोडीशी चौकशी केल्यावर आम्ही गडावरील ‘गंगासागर’ तलावावर येऊन पोहोचलो आणि ते स्वच्छ निर्मळ पाणी पाहून आम्ही सुखावलो. पोटभर पाणी पिऊन आम्ही काही काळ तेथेच विसावलो. भुकेल्या नजरेने आम्ही त्या पवित्र वास्तूचे दर्शन घेण्यास निघालो. प्रत्येक जागा इतिहासाचे एकएक पान उलटवीत होती. याच ठिकाणी जिजाऊमातेने शिवरायाला आशीर्वाद दिला असेल या भावनेने भारावून जाऊन तेथील थोडी माती उचलून आम्ही अंगारा म्हणून कपाळाला लावली. नंतर आम्ही राजांच्या दरबारात प्रवेशलो. त्यावेळी तेथे कोणीही नव्हते. पण महाराजांच्या आगमनाप्रीत्यर्थ दिलेली ‘खडी ताजीम’ माझ्या कानांत घुमली. अभिषेकाच्या प्रसंगी गागाभट्टाने म्हटलेले संस्कृत मंत्र कानांत घुमू लागले आणि त्या दरबाराच्या अवशेषांनी सारा इतिहास मला ऐकविला. निसर्गाने या पवित्र वास्तूवर जेवढे प्रहार केले त्याहूनही अधिक फोडतोड माणसांनी केलेली पाहून मन कष्टी झाले.
महाराजांचा मोडकळीस आलेला महाल पाहताना त्या थोर राजाचे शेवटचे दिवस मला आठवले. तोफखान्याची जागा पाहून आम्ही पुढे सरकलो. टकमक टोक, हिरकणी बुरूज हयाएकएक जागा त्यागाच्या, धाडसाच्या कथा सांगत होत्या. आणि मग मला दिसली ती जागा, ज्या ठिकाणी ते थोर जीवन सपले; पण ते स्थानही एका इमानी, स्वामिनिष्ठ कुत्र्याचे स्तोत्र गात होते. आम्ही त्या श्रीमान योग्याच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि गड उतरू लागलो, पण आता पावले जड झाली होती.
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा मी रायगड बोलतोय वर निबंध (I am talking about Raigad Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा I am talking about Raigad Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा मी रायगड बोलतोय वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.