मोबाईल लाईफस्टाईल वर निबंध |Mobile lifestyle Essay in Marathi |Mobile lifestyle Nibandh

Mobile lifestyle Essay in Marathi |Mobile lifestyle Nibandh

अतिशयोक्ती वाटेल… पण हे काही दिवसात प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे…. आई स्वयंपाकघरात, बाबा हॉलमध्ये, मुलगा त्याच्या खोलीत, ताई कुठेतरी बाहेर, आजोबा-आजी त्यांच्या खोलीत. पण एकमेकांशी गप्पा मारताहेत. चक्क WhatsApp वरुन. प्रत्येक कुटुंबाचा एक स्वत:चा ग्रुप असेल. तसा बर्‍याच कुटुंबांनी आत्ताच बनवलाय. त्या ग्रुपवरुनच आई सांगेल… “चला जेवायला”. बाबा कदाचित चिंटूला विचारतील “अभ्यास झाला का रे बाबा?”. आजी आजोबांना विचारेल “अहो त्या लाल कॅप्सूल घेतल्या का?”.

काही दिवसांपूर्वी ठाण्यातले प्रतिथयश आणि लोकप्रिय कार्डिओलॉजिस्ट डॉ. दयानंद कुंबळा यांच्या व्याख्यानाला हजर रहाण्याची संधी मिळाली. त्यांच्या डॉक्टर तुमच्या भेटीला या उपक्रमाद्वारे ते पेशंटना मोलाचे मार्गदर्शन करत असतात. २००२ पासून सुरु असलेला हा उपक्रम अव्याहतपणे दर महिन्यातून एकदा सहयोग मंदिराच्या सभागृहात पार पाडला जातो. आजपर्यंत अनेक नामांकित आणि मानांकित डॉक्टरांनी या कार्यक्रमातून ठाणेकरांशी संवाद साधला आहे.

हे व्याख्यान शरीराची काळजी घेण्यासाठी फिटनेस, व्यायाम वगैरेबाबत होते. व्याख्यानाचा विषयच मुळात “Exercise – Good or Bad” असा होता. त्यामुळे उत्सुकता वाढली होती. अनेक नवीन गोष्टी शिकायलाही मिळाल्या.

या विषयावरील व्याख्यानासाठी माझ्या मते आजच्या तरुण पिढीनेही उपस्थित असणे मला अपेक्षित होते. मात्र तरुण पिढीची अशा कार्यक्रमांबाबतची अनास्था बरेच काही सांगून जाते.

आज आपण सर्व एका अशा लाईफस्टाईलचे घटक झालो आहोत की Activeness आपल्या आयुष्यातून हद्दपार होत आहे का अशी शंका यावी. कदाचित आज सर्वच गोष्टी आणि सर्व प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी अशा प्रकारच्या कार्यक्रमांपासून दूर रहात असावी. मात्र इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती नेहमीच विश्वसनीय असतेच असे नाही. त्याचप्रमाणे सध्या सोशल नेटवर्कस, WhatsApp वगैरे माध्यमातून कोणीही “अनाहूत, अनावश्यक सल्ले” अतिशय ठामपणाने मांडताना आणि शेअर करताना दिसतात. विषयाची संपूर्ण माहिती न घेता केवळ फॉरवर्ड करणे ही सध्याची एक मोठी समस्या आहे. अनेकदा या फॉरवर्ड करण्याच्या नादात अक्षरश: वर्षभरापूर्वीचे मेसजही नवेच आहेत असे समजून फॉरवर्ड केले जातात. यातून बर्‍याचदा अनावश्यक समस्याही उदभवलेल्या आहेत. अमूक एका रुग्णाला तातडीने रक्त हवे आहे वगैरेसारखे मेसेज बर्‍याचदा जुने असतात. असो… विषयांतर नको.

आज आपण ज्या मोबाईल किंवा रिमोट लाईफस्टाईलचे बळी झालो आहोत त्यामुळे एकूणच आपली चालण्या-फिरण्याची (Physical Movements) गरज कमी झाली आहे. तरुण काय किंवा प्रौढ आणि वृद्ध मंडळी काय… ही तर सगळ्यांचीच समस्या आहे.

पूर्वी टीव्ही लावायला किंवा चॅनेल बदलायला उठून टिव्हीपर्यंत जायला लागायचे. आता हेच काम रिमोटने होते. पूर्वी जाते किंवा पाटा वरवंट्याचा वापर होत असे, आता सगळीकडे मिक्सर आणि फूड प्रोसेसर आले. पूर्वी मनोरंजनासाठी आजोबा-आजी लहान मुलांना बागेत घेउन जात असत. आता तेच आजोबा-आजी टिव्हीसमोर बसून सिरियल्स बघत असतात आणि नातवंडं मोबाईलमध्ये गर्क असतात. पूर्वी वाण्याकडे किंवा भाजी आणायला निदान एकतरी फेरी घराबाहेर व्हायची. आता मात्र सगळीकडेच होम डिलिव्हरीचा जमाना आलाय त्यामुळे बाहेर जाण्याची आवश्यकताच नाही. पूर्वी निदान महिन्यातून एक-दोन वेळा तरी बॅंकेत पैसे काढायला भरायला जावे लागे. विजेची किंवा दुरध्वनीची बिले भरायला जावे लागे. आता बिले भरणं इंटरनेटवरुनच होतं आणि रोख रक्कम अभावानेच लागते कारण सगळी कामं कार्डावरच होतात.

आता तर अगदी सगळीच कामे मोबाईलवरुन होतील अशी व्यवस्था जन्माला आलेय. टिव्हीचं सोडा.. पण पंखा, दिवे लावणं आणि बंद करणं आणि इतकंच कमी म्हणून पडदे वगैरे उघडणं, बंद करणं हेसुद्धा मोबाईलवरुनच करायची सोय झाली आहे. यावर कळस म्हणजे घराची बेल वाजल्यावर कोण आलंय ते मोबाईलवरच बघा आणि मोबाईलवरचंच बटण दाबून दरवाजाही उघडा… खिडक्यांचे पडदेही रिमोटने उघडण्याइतकं तंत्रज्ञान प्रगत झालंय.

डॉक्टर कुंबळांचं व्याख्यान संपल्यावर सहज विषय निघाला. तंत्रज्ञानाने माणसाला आळशी बनवलं आहे का? माझ्या मते थोडंफार आळशी बनवलं आहे. डॉक्टरांच्या मते मात्र हा आळस आत्ताच झटकला नाही तर मात्र कठीण आहे. दवाखान्यांची पायरी जवळंच आहे. नव्या तंत्रज्ञानाचा हा महिमा आहे. जितकं चांगलं आहे तेवढंच वाईटही. तेव्हा काय करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा मोबाईल लाईफस्टाईल वर निबंध (Mobile lifestyle Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Mobile lifestyle Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा मोबाईल लाईफस्टाईल वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment