Mohammed Ali Essay in Marathi | Mohammed Ali Nibandh
मी लहानपणी खूपच काटकुळा होतो अगदी बरगडया सहज मोजता येतील इतका ! मात्र पुढे आयुष्याच्या एका टप्प्यावर व्यायामाची गोडी लागली अन नंतर तिचे रुपांतर जिमच्या व्यसनात झाले. अर्नोल्ड आणि सिल्व्हेस्टर स्टेलोनच्या सिनेमांचा तो परिणाम असावा असं म्हणायला काही हरकत नाही. जीवनातील पोटापाण्याच्या सोयीत उमेदीची अनेक वर्षे कारणी लागल्याने ‘हे करायचे राहूनच गेले’ अशा घटकांची यादी माझ्या जीवनात अंमळ मोठीच आहे. त्यातलीच एक बाब म्हणजे ‘आपण चांगले धडधाकट शरीर कमवून हातावर काळेकुट्ट ग्लोव्हज चढवून समोरच्या मुष्टीयोद्धयाशी चार हात करणे !’ ही इच्छा दिवास्वप्न बनून गेली.आज हे सर्व आठवायचे कारण म्हणजे किशोरवयात एके काळी ज्या काही व्यक्तींचे आकर्षण होते अशापैकी एक मुहम्मद अलीची चटका लावणारी एक्झिट ! मी कधी बॉक्सिंग खेळलो नाही वा या खेळाच्या खूप बारकाव्यांची माहिती जाणून घेतली नाही मात्र अलीबद्दल एक सुप्त आकर्षण कायम मनात असायचे. सिल्व्हेस्टर स्टेलोन आणि व्हेन डेमचे सिनेमे पाहून बॉक्सिंग खेळाचे आकर्षण ज्या काळात झाले नेमक्या त्याच कालखंडात मुहम्मद अली बॉक्सिंगच्या शिखरावर होता. त्यामुळे तो त्या क्षेत्रातला जागतिक आयकॉन झाला. आज तो आपल्यात नाहीये मात्र त्याचं जगणं अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील यात संशय नाही.
१७ जानेवारी १९४२ रोजी केंटकीमधल्या लुईजविल शहरात ओडेसा क्ले आणि कॅशियस मार्सेलस सिनियर ह्यांच्या पोटी जन्माला आलेला कॅशियस क्लेचं बालपण आनंदात गेलं होतं. अलीच्या वडिलांना पाच भावंडे होती. ते आफ्रोअमेरिकन वंशाचे होते, व्यवसायाने ते पेंटर होते. तर ‘कॅशियसची क्ले’ची आई गोर्यांकडं कामवाली बाई होती. उत्पन्न कमी असले तरी या दांपत्याने मुलांना काही कमी पडू दिले नाही.
कॅशियसच्या घरी गरीबी इतकी होती की त्याच्या स्कूलबससाठीही पैसे नसायचे. मग कॅशियस रोज बसबरोबर शर्यत लावायचा आणि धावत शाळेत जायचा. पुढे काही दिवसांनी त्याच्या वडिलांनी त्याला एक नवी कोरी ‘श्विन’ सायकल घेऊन दिली. मात्र काही दिवसातच ती सायकल चोरीला गेली. जो मार्टिन नावच्या पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार करायला गेल्यावर त्याला अलीने सुनावले की, “चोर जर त्याच्या तावडीत सापडला तर त्याला चौदावे रत्न दाखवेन !” यावर मार्टिनने त्याला हिणवत ‘आधी तब्येत बनव अन मग झोडायच्या गोष्टी कर’ असा सल्ला दिला. आपल्या गरीब वडिलांनी मोठ्या हौसेने घेऊन दिलेली सायकल चोरीस गेल्यामुळे व्यथित झालेला कॅशियस ‘जो मार्टिन’च्या सल्ल्याने पेटून उठला आणि दुसर्या दिवसापासून तो जिममध्ये जायला लागला ! आधीच अंगापिंडानी धष्टपुष्ट असलेला कॅशियस व्यायाम आणि बॉक्सिंगमुळे प्रचंड ताकदवान बनला. पण खरंतर तिथं त्याची रग जिरली नव्हती. त्याला त्याच्या आवेशाबद्दल फाजील आत्मविश्वास होता अन त्यातूनच समोरच्याला ठोकून काढायची भाषा तो सातत्याने बोलायचा.
खरं तर बॉक्सिंगमध्ये बडबडीला कमी लेखलं जातं. तिथं अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे फिटनेस आणि स्टॅमिना. एका सव्वादोनशे पौंडाच्या सुपर फिट बॉक्सरचे ठोसे पंधरा राऊंड – ४५ मिनिटे – सहन करणे याकरिता अफाट सहनशक्ती आणि क्षमता लागते. बॉक्सिंगमध्ये अनेक डावपेच आहेत. प्रतिस्पर्ध्याचा डोक्यावर ‘जॅब’ मारले तर तो हात वर घेऊन बचाव करतो. मग त्याच्या बरगड्या आणि किडनी उघड्या पडल्या की त्यावर ‘बॉडी शॉट’ मारता येतो. त्यावर बचाव करण्यासाठी हात खाली घेतले की उलटून डोक्यावर प्रहार करता येतो. ‘नॉक आउट’ फक्त डोक्यावर न मारता घणाघाती ‘किडनी शॉट’नेही करता येतं. ज्याप्रमाणे लढतीचे डावपेच आहेत त्याप्रमाणे मुष्टीयोद्ध्यांचीही गटवारी आहे. काहीजण एका जागी उभं राहून आपल्या राक्षसी ताकदीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना वाकवतात, (जॉर्ज फोरमन, सॉनी लिस्टन, ). तर काही जण प्रतिस्पर्ध्याच्या एकदम खेटूनच उभं राहून भक्कम बचाव आणि बलशाली हुक्स व कट्स च्या साहाय्याने प्रतिस्पर्ध्याला जेरीस आणतात ( जो फ्रेझियर, माईक टायसन). कोपरात हात वाकवून ताकदीने हाणलेले हे हूक्स – कट्सचे ठोसे कधी कधी जीवघेणेही ठरतात. तर काही नेमके याच्या विरुद्ध शैलीचे असतात, ते प्रतिस्पर्ध्यापासून लांब राहून ‘मौका देखके’ घणाघाती घाव घालतात. कॅशियस शीघ्र हालचाली करण्यात तरबेज होता. त्याच्यावर केलेल्या प्रहरांच्या बदल्यात त्याचे रिफ्लेक्स वेगवान असत. मुष्टीयोद्ध्याची शैली आणि त्याने वापरलेले डावपेच यावर लढतीचा वेळ आणि निकाल अवलंबून असे. मिकी वार्ड आणि अल्फोन्सो सँचेझ याच्या लढतीत वार्डने एक योजनाबद्ध प्लेथीम वापरली होती. पहिले पाच राउंड तो फक्त बचाव करत राहिला आणि अल्फोन्सो पूर्ण ताकदीनिशी ठोसे मारत राहीला. आठव्या राउंडमध्ये आक्रमक झालेल्या वार्डने सातत्याने आक्रमण करुन थकलेल्या सँचेझला एका किडनी शॉटमध्ये गारद केले होते. अली-फोरमन लढतीतदेखील अलीनेही हीच क्लृप्ती वापरली होती.
कॅशियसचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो बॉक्सिंग रिंगमध्ये जलद हालचाली करायचा. हेवी वेट चँपियन अंगाने वजनामुळे जड असतात, त्यांच्या हालचाली शिथिलता असते. या उलट कॅशियसच्या अनेक फाईटस मध्ये त्याच्या प्रतिस्पर्ध्यीचे ठोसे हवेत जात असत कारण आपल्या जलद गतीच्या आधारे तो ठोसे चुकवायचा. हवेत ठोसे मारुन मारुन प्रतिस्पर्धी गळाटून गेला की तो सर्व ताकदीनिशी हल्ला चढवी अन मोजून काही ठोश्यांतच प्रतिस्पर्धी नामोहरम होऊन जाई.
वयाच्या अठराव्या वर्षअखेरीस १९६० साली त्याने शिकागोच्या “गोल्डन ग्लव्ह” सह अमेरिकेतली सर्व महत्त्वाची स्पर्धा जिंकल्या होत्या. या दैदिप्यमान कामगिरी नंतर त्याची रोम ऑलिंपिक्ससाठी निवड होणं पक्कं होतं. रोमला जाताना मात्र कॅशियसला विमानाची भीती घालवण्यासाठी मनाची खूप तयारी करावी लागली. कारण तो विमान प्रवासाला खूप घाबरायचा. त्याच्या ट्रेनर्सनी त्याला कसेबसे समजावले तेंव्हा तो विमानात बसायला राजी झाला मात्र निघताना त्याने पाठीवर स्वतः खरेदी केलेलं पॅराशूट सोबत घेतलं. रोममध्ये स्पर्धेच्या रिंगेत बेल्जियन, रशियन आणि ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम केल्यावर “लाईट हेवीवेट” गटाच्या अंतिम फेरीत त्याला पोलंडच्या अनुभवी झिबिग्न्युशी झुंजावं लागलं. ज्याच्या गाठीस दोनशेहून अधिक लढतींचा अनुभव होता. मात्र १८ वर्षीय कॅशियसनं सर्वांचे अंदाज चुकवत या पोलिश मुष्टीयोद्धयास रक्ताने माखवून हरवले अन सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यानं थेट ऑलिंपिकच्या सुवर्णपदकास गवसणी घातली .१९६०च्या रोम ऑलिंपिक्समध्ये मिळवलेल्या या सुवर्णपदकाने त्याच्या युगाचा एल्गार झाला. त्याचबरोबर त्याची व्यावसायिक कारकीर्दही सुरु झाली. लुईव्हिलच्या सात कोट्याधीशांनी मिळून ‘लुईजविल स्पॉन्सरशिप ग्रुप’ या नावाने अन व्यावसायिक हेतूने त्याच्याशी १०,००० $ चा करार केला. कॅशियसचे ते सुगीचे दिवस होते मात्र मिडीयाने या घटनेला गोर्या लोकांचा उदात्तभाव संबोधून त्यांची भलावण केली. याने कॅशियसची परिस्थिती सुधारली मात्र त्याच्यावर गोऱ्या लोकांचे बॉसिंग वाढले. ही गोष्ट त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर त्याने हा करारच मोडून टाकला.
कॅशियस एक योद्धा म्हणून जितका ग्रेट होता तितकाच तो त्याच्या तत्वाशी ठाम असणारा माणूस म्हणूनही भारी होता. त्याने बॉक्सर म्हणजे मठ्ठ, शिथिल, आडमुठा, अरसिक, हेकट आणि स्वार्थी माणूस या सर्व प्रतिमा उध्वस्त केल्या. तो एक चांगली काव्यसमज असणारा व्यक्ती होता. कविता ही केवळ हळव्या आणि सृजन लोकांना समजते हा समज देखील त्याने मोडीत काढत एक विश्वविजेता बॉक्सर हा एक चांगला काव्यप्रेमी असू शकतो हे त्याने दाखवून दिले. कॅशियसला कविता वाचण्याचा आणि करण्याची आवड होती. रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याला लोळवणारा कॅशियस रिकाम्या वेळात लँगस्टन ह्युजेसच्या कविता वाचत असे. कॅशियसच्या कविता मुख्यत्वे प्रतिस्पर्ध्याचे खच्चीकरण करण्यासाठीच रचलेल्या असत. प्रतिस्पर्धी कितव्या राउंडमध्ये गारद होईल हे तो कवितेमधून सांगत असे. सॉनी लिस्टनच्या लढतीच्या वेळी त्याने केलेल्या कवितेत तो आठव्या फेरीअखेर कोसळेल असं कवितेत लिहिलं आणि झालंही तसेच. {Sonny Liston is great, but he will fall in eight…}लिस्टन कडे अती आत्मविश्वास होता. कॅशियसच्या बुटकेपणामुळे तो लिस्टनच्या ठोशापासून वाचला होता. त्याचवेळी तो मात्र लिस्टनला ठोसे लगावू शकत होता. ही लढत कॅशियसच्या कारकिर्दीतील महत्वपूर्ण टप्पा होती. व्हिएटनाम युद्ध चालू असताना सैन्यात भरती होण्याचा आदेश आल्यावर कॅशियसने “व्हिएटनामी लोकांशी माझं वैर नाही” असं सांगून नकार दिला. तो म्हणाला “Why should they ask me to put on a uniform and go 10,000 miles from home and drop bombs and bullets on Brown people in Vietnam while so-called Negro people in Louisville are treated like dogs and denied simple human rights? No I’m not going 10,000 miles from home to help murder and burn another poor nation simply to continue the domination of white slave masters of the darker people the world over.” त्याच्या जहाल उत्तरामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला. त्याचं विश्वविजेतेपद, पारपत्र काढून घेण्यात आलं. त्याच्यावर बॉक्सिंग खेळण्यासाठी मार्च १९६७ ते ऑक्टोबर १९७० अशी साडेतीन वर्षं बंदी घालण्यात आली. पुढे काही काळानंतर व्हिएटनाम युद्धावर पत्रकारांनी विचारणा केल्यावर त्याने ही कविता वाचली होती-
Keep asking me, no matter how long
On the war in Viet Nam, I sing this song
I ain’t got no quarrel with the Viet Cong . . .
अमेरिकेत ज्या अनेक कृष्णवर्णीय गौरवशाली लोकांना वर्णभेदाचे शिकार व्हावे लागले त्यात कॅशियसचे देखील नाव सामील आहे. मार्टिन लूथर किंग पासून ख्रिस रॉक पर्यंत अशी अनेक वानगीदाखल नावे सांगता येतील. या सर्व लोकांना बदनामी, चारित्र्यहनन आणि हत्या अशा षडयंत्राला सामोरे जावे लागले. कॅशियसला लहानपणापासूनच वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. त्याच्या दिनचर्येत असे प्रसंग दिवसभर ठासून भरलेले असत. कॅशियसला जेंव्हा रोममध्ये सुवर्णपदक मिळाले तेंव्हा त्याला वाटले की आपला वनवास संपला. मात्र तसे घडले नव्हते. एकदा तो एका मित्राबरोबर हॉटेलात गेला असताना हॉटेलमालकाने ‘निग्रोना प्रवेश निषिद्ध’ आहे असं सुनावल्यावर कॅशियसनं त्याचं चोवीस तास त्याच्या गळ्यात असणारं सुवर्णपदक दाखवलं. तरीही तो हॉटेलमालक त्याला बधला नाही. तिथून आपल्या मनात आक्रोश घेऊनच तो बाहेर पडला अन पुढे जाऊन एका बायकर गँगने त्याला अडवलं. या गँगलीडरच्या जीएफला त्याच्या गळयातलं सुवर्णपदक हवं होतं. त्यांच्या तोंडाला न लागता तो तिथून स्वतःवर ताबा ठेवत आपल्या घराकडे निघाला. मात्र शहराबाहेरील बाह्यवळणावर तो बायकर्सचा लीडर त्याच्या मित्रासह कॅशियसच्या मागे लागला. आता आणखी पळून जाण्यापेक्षा काहीतरी उत्तर दिलेले बरे या हेतूने कॅशियस थांबला. त्यांनी हात उगारताच कॅशियसने फक्त एक ठोसा लगावला ज्यात तो लीडर गारद झाला. मात्र या हाणामारीने व्यथित झालेल्या कॅशियसने त्याचे सुवर्णपदक नदीच्या पात्रात भिरकावून दिले ! अशा प्रकारे तो वर्णभेदाचा शिकार होत राहिला. त्याच्यावर येन केन प्रकारे गुन्हे दाखल होत राहिले. याच काळात अन्य गोरे खेळाडू गंभीर गुन्हे करूनही त्यांच्या क्रिडाप्रकारात खेळत राहिले अन कॅशियसला मात्र जवळपास पाच वर्षे बॉक्सिंग रिंगच्या बाहेर राहावे लागले. अखेर चार वर्षे कोर्टात लढल्यानंतर अमेरिकन न्यायालयातील ज्युरींनी कॅशियसची ८-० अशी एकमताने निर्दोष मुक्तता केली
सलग तीन वेळा हेव्हीवेट चँपियन राहिलेल्या कॅशियसवर या कोर्टकज्जांचा बराच परिणाम झाला. हेन्री कूपरबरोबरच्या मॅचमध्ये तिसरा राउंड चालू असताना एक सेकंद अलीचं लक्ष पुढच्या रांगेतल्या एलिझाबेथ टेलर आणि रिचर्ड बर्टनकडे गेले. दुसर्याच क्षणाला त्याला आपल्या जबड्यावर एक जबरी पंच जाणवला आणि तो कोसळलाच. त्याचा जबडा मोडून त्याला तीन महिने सक्तीचा आराम करावा लागला. एका क्षणासाठी एकाग्रता भंग पावली तरी काय होऊ शकते याचे हे बोलके उदाहरण. तेव्हाच्या जागतिक हेवी वेट चँपियन सॉनी लिस्टनसोबतच्या लढतीपासून कॅशियस खऱ्या प्रकाशझोतात आला होता. सॉनीने त्याच्या आडमाप ताकदीच्या बळावर फ्लॉइड पॅटरसनसारख्या पहाडी गड्याला अवघ्या १२६ सेकंदात मोडतोड करून भिरकावलं होतं. विशेषज्ञांच्या मते क्लेला ही लढत जिंकण्याची कोणतीही संधी नव्हती. सात फेऱ्या झाल्या तरी लिस्टन हतबल होऊन उभा होता, कॅशियस क्लेच्या जलदगती बचावापुढे त्याचे आक्रमण तोकडे पडले. सातव्या फेरीत लिस्टननं पुढे लढायला नकार दिला ! तेव्हा रिंगभर नाचत कॅशियसने आपल्या टीकाकारांना सुनावलं होतं की, “आता तुम्हीच सांगा कोण महान आहे आणि आधी उच्चारलेले आपले शब्द परत गिळून टाका !”
ह्या लढतीनंतर कॅशियसनं इस्लाम स्वीकारल्याचं जाहीर केलं. सुरुवातीला त्याला आपल्या नावाचा अभिमान होता. पण नंतर त्याला हे नाव आणि ख्रिस्ती धर्म त्याच्या गुलाम पूर्वजांची ओळख आहे असं वाटू लागलं. म्हणून त्याने इस्लाम धर्मात प्रवेश केला आणि तो मुहम्मद अली झाला. नंतर कुणीही त्याच्या जुन्या नावाने हाक मारलेली त्याला खपत नसे. त्याने नवे नाव धारण केलं ते “महंमद अली”! ह्यामुळे त्याच्यावर खूप टीका झाली, खूप वाद झाले. या दरम्यान झालेल्या एका लढतीत एमी टेरेली नामक त्याचा प्रतिस्पर्धी त्याला लढतीआधी उचकवण्यासाठी मुद्दाम होऊनच “क्ले” म्हणून संबोधत होता. या लढतीत त्याला हाणताना प्रत्येक ठोश्यागणिक अली त्याला विचारत होता…. “आता माझं नाव काय ते सांग !!” या लढतीत टेरेलीची हाडे त्याने खिळखिळी केली होती.
मार्च १९७१ मध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये अलीची “fight of the century” झाली ती जो फ्रेझियरशी. १९६७ ते ७० च्या साडेतीन वर्षांच्या बंदीच्या अवधीने हालचाली शिथिल झालेल्या अलीने मार्च १९७१ मध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधल्या लढतीत जो फ्रेझियरशी सर्व ताकद एकवटून झुंज दिली मात्र सुमारे ३१ व्यावसायिक लढतींनंतर आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्या पराभवाचा सामना त्याला करावा लागला ! पुढे १९७४ मध्ये क्ले पुन्हा फ्रेझियरशी लढला तेव्हा मात्र त्याने त्याला नमवलं. त्यानंतर झाली ती ड्रीम फाईट ! मुष्टीयुद्धातली आजवरची सर्वात ग्लेमरस तुंबळ लढाईच ! तत्कालीन जगज्जेता जॉर्ज फोरमन आणि माजी जगज्जेता मुहंमद अली या दोघांत ही लढत झाली. लढतीआधी अलीने फोरमनसाठी खास कविता रचली होती-
You know I’m bad.
just last week, I murdered a rock,
Injured a stone, Hospitalized a brick.
I’m so mean, I make medicine sick.
I’m so fast, man,
I can run through a hurricane and don’t get wet.
When George Foreman meets me,
He’ll pay his debt.
I can drown the drink of water, and kill a dead tree.
Wait till you see Muhammad Ali.
सव्वासहा फुटी, शंभर किलोहून अधिक वजनाचे हे दोन बलशाली पहाड जेंव्हा झुंजले तेंव्हा अख्खे जग त्यांच्याकडे डोळे लावून होते. या लढतीपूर्वी सलग ४० लढतीत अजिंक्य राहिलेल्या फोरमनने जगज्जेत्या फ्रेझियरला अवघ्या २ मिनिटांत नॉक आउट करून जगज्जेतेपद पटकावलं होतं. तर अली देखील कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्यानेही फ्रेझियर, नॉर्टन, लिस्टनसारख्या बहुबलींना लोळवलं होतं. कोण जिंकेल कोण हरेल याचा अंदाज बांधणं कठीण होतं. ३० ऑक्टोबर १९७४ रोजी ६०,००० लोकांनी तुडूंब भरलेल्या किंशासाच्या माइ स्टेडियमकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अफाट जाहिरातबाजी झालेल्या अन चर्चेत राहिलेल्या या लढतीचे अनेक देशात टीव्हीवरून थेट प्रसारण केले गेले.दोघेही लढवय्ये होते त्यामुळे काय घडणार याची सर्वांना उत्सुकता होती.
ही लढत झाली देखील तशीच, अगदी रोमहर्षक ! तब्बल सात फेऱ्यापर्यंत दोघेही एकमेकावर घणाघाती ठोसे लगावत होते, एकमेकांच्या ठोशांपासून दोघेही सशक्त बचाव देखील करत होते, दोघेही रक्ताने माखले होते, दोघेही प्रत्येक फेरीत डावपेच बदलून खेळत होते. दोघेही टिच्चून उभे होते. कुणीच मागे हटायला तयार नव्हते. आठव्या फेरीला मात्र अली रिंगला खेटून उभा राहिला अन त्याने फोरमनचे अनेक ठोसे पचवले. त्यानंतर त्याने जे केलं ते अविस्मरणीय होतं ! त्याने लागोपाठ पंचेसचा भडीमार सुरु केला त्यातलाच एक पंच फोरमनच्या तोंडावर बसला अन हा घाव जणू त्याच्या वर्मी बसला. फोरमन पाठीवर खाली पडला आणि तो उठून पुन्हा सज्ज होईपर्यंत रेफ्रीचे दहा अंक मोजून झाले होते. जगाला नवा हेवीवेट चँपियन लाभला होता, ‘मुहम्मद अली !’ या लढतीनंतर अली बर्याच लढती खेळला. त्याने अनेक लढती जिंकल्या अन ७६ नंतर मात्र त्याचं शरीर मंदावलं. लिऑन स्पिंक्स, लॅरी होम्स व अखेरीस ट्रेव्हर बर्बिककडून हरल्यावर अलीने बॉक्सिंग रिंगला अलविदा केलं.
त्याच्या अखेरच्या काळात त्याला ‘पार्किन्सस सिंड्रोम’ या आजाराशी झुंजावं लागलं. तत्पूर्वी त्याने संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने अनेक देशात सदिच्छा दौरे केले. १९९६ मध्ये अली-फोरमनच्या Rumble in the Jungle वरच्या लघुपटाला मिळालेलं ऑस्कर घेताना त्याचा एकेकाळचा प्रतिस्पर्धी आणि नंतरचा जीवश्च कंठश्च मित्र जॉर्ज फोरमनने पार्किनसन्सग्रस्त अलीला आधार दिला होता. या घटनेने तेंव्हा अनेकांचे मन हेलावून गेले होते. अलीचे उर्वरित आयुष्य त्याची सामाजिक बांधिलकी किती प्रगल्भ होती याचे दार्शनिक आहे. त्याने वर्ण, लिंग, धर्म,देश, प्रांत कशाचेही बंधन न बाळगता कोट्यावधी गोरगरिबांना सढळ हाताने मदत केली. पार्किनसन्सग्रस्तांसाठी “मुहंमद अली पार्किन्सन सेंटरची” स्थापना केली. त्याच्यातला मुष्टीयोद्धा जसा जगज्जेता ठरला होता तसाच त्याच्यातला माणूसही जगभरातल्या मानवी मनांचा जेता ठरला होता. मुष्टीयुद्ध हा खेळ आजही अनेक जण एक क्रूर खेळ म्हणूनच ओळखतात मात्र हा तथाकथित क्रूर खेळ खेळून, त्यात जग जिंकूनही आपल्या अंतःकरणातील मृदू, मुलायम, हळव्या, सृजनशील अन कवीमनाला जपून ठेवणारया मुष्टीयोद्ध्याला काय संबोधन वापरायचे याचे शब्द कदाचित ऑक्सफोर्डच्या डिक्शनरीत देखील नसावेत !
अलीने एकूण ६१ लढती खेळल्या होत्या, त्यातील ५६ लढतीत तो विजेता ठरला होता. या ५६ विजयातील ३७ विजय त्याने प्रतिस्पर्ध्याला ‘नॉक आऊट’करून मिळवले होते.त्याच्या करिअरमध्ये तो केवळ पाच लढती हरला. ‘द ग्रेटेस्ट’, ‘द पीपल्स चँपियन’ आणि ‘द लुईजविल लीप’ ही त्याची टोपणनावे होती. अलीचे चार विवाह झाले होते. त्याला एकूण आठ अपत्ये होती. त्याची पहिली पत्नी सोंजी ही एक बारवेट्रेस होती. मुस्लिम महिलांनी घालावयाच्या बुरख्यावरून त्यांचे बिनसले. त्याच्या दुसऱ्या पत्नीने बेलिंडाने रीतसर इस्लाम धर्म स्वीकारला होता, एका जुळ्यासह तिच्यापासून अलीला चार अपत्ये झाली. व्हेरोनिका बरोबर त्याचे अफेअर सुरु झाल्यावर तिने त्याला सोडचिठ्ठी दिली. व्हेरोनिकापासून अलीला दोन मुली झाल्या. मात्र तिच्याशीही त्याचा संसार सुखाचा होऊ शकला नाही. त्याच्या जन्मगावातली लुईजविलेतली बालमैत्रीण ल्युनी विल्यम्सशी त्याने चौथा विवाह केला. विशेष म्हणजे तिने त्याच्याशी निकाह लावता यावा म्हणून विसाव्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला होता. ल्युनी विल्यम्सवर त्याने प्रेम केले मात्र तिच्यापासून अपत्य झाले नाही, तेंव्हा या दांपत्याने ५ महिने वयाच्या असद अमीनला दत्तक घेतले ! या व्यतिरिक्त अलीला विवाहबाह्य संबंधातून दोन मुली झाल्या, त्यांनाही त्याने औरस मुलींचा दर्जा दिला. आपलं कुठलंही अफेअर त्यानं कधी लपवून ठेवलं नाही. तो जे काही करायचा ते सर्वांसमोर असे, त्यात आडपडदा नव्हता. तरीही त्याला कर्मठ म्हंटलं गेलं. त्याच्या पाठीमागे बॉक्सिंगचा वसा त्याच्या मुलीने लैलाने चालवला. अलीची तिसरी पत्नी व्हेरोनिकाची लाडकी मुलगी लैला अली ही मुहम्मदची सर्वात यशस्वी मुलगी म्हणून आजही ओळखले जाते. लैलाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉक्सिंग लिजेंडची मुलगी म्हणून ओळखल्या जाणा-या लैलाला आजपर्यंत एकही बॉक्सर मात देऊ शकले नाही. यामुळेच तिला लिजेंड लैला म्हणून ओळखले जाते. ‘आपल्या पाठीमागे आपला वारसा मुलीने पुढे चालू ठेवला आहे’ ही गोष्ट त्याला इथून एक्झिट घेताना समाधान देऊन गेली असेल.
काल मध्यरात्री अमेरिकेतील ऍरिझोना रुग्णालयात निधन झाले तेंव्हा हा योद्धा ७४ वर्षांचा होता. त्याच्या इच्छेनुसार त्याच्या मूळ गावी लुईजविले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. तो भलेही देहाने आपल्यात नसेल मात्र त्याचे असंख्य स्मृतीकण सर्वांच्या मनात असतील. त्याच्या ‘द ग्रेटेस्ट माय ओन स्टोरी’ या आत्मचरित्रात त्याचा जीवनपट त्याने जसाच्या तसा मांडला आहे. तो वाचण्याजोगा आहे.
‘मी कधी बॉक्सिंग खेळू शकलो नाही पण मी मुहम्मद अलीला कधी विसरू शकत नाही’ ही जी माझी आज भावना आहे तीच जगभरातल्या अब्जावधी नागरिकांची असेल यात शंका नाही.
अलविदा अली ………
अल्लाह तुम्हे जन्नत नसीब करे..आमीन ….
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा मोहम्मद अली वर निबंध (Mohammed Ali Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा Mohammed Ali Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा मोहम्मद अली वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.