My summer vacation Essay in Marathi |My summer vacation Nibandh
आपण सर्वजण मित्र मैत्रिणींशी गप्पा मारताना कोणी विचारले की तुझा “आवडता ऋतू कोणता”तर कदाचित सर्वांचेच उत्तर पावसाळा असे असते. निसर्गाला सुंदर अशा हिरव्या चादरीने रंगवून टाकणारा,सृष्टीचं देखणं रूप दाखवून तिच्या प्रेमात पडायला लावणारा आणि मनुष्याबरोबरच इतर सर्व सजीव प्राण्यांना-पक्ष्यांना सुखविणारा असा हा ऋतू आहे. आनंद आणि उत्साह देणारा असा हा पावसाळा ऋतू. काही जण या प्रश्नाचे उत्तर हिवाळा असेही देतील. गुलाबी थंडी ,बोचरी पण मन शांत आणि प्रसन्न करणारा असा हा हिवाळा ऋतू आहे.
पण माझ्या प्रश्नाच उत्तर याहून वेगळं आहे. मला या सर्व ऋतूंमध्ये उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो. कारण माझ्या लहानपणीच्या भरपूर काही आठवणी या उन्हाळ्याशी निगडित आहेत. उन्हाळ्यात वाढलेले तापमान असले तरी त्याचबरोबर येणारी उन्हाळी सुट्टी ही खूप आनंद देऊन जाते. शाळेमध्ये शिपाई काका वर्गात वेळापत्रक घेऊन आले कि परीक्षा कधी आहे हे पाहण्या आधी उन्हाळी सुट्टी कधीपासून आहे हे आम्ही पाहतो. त्यानंतर आमची परीक्षा होते. शेवटच्या दिवशी आम्ही पार्टी करतो आणि त्यानंतर आमची उन्हाळ्याची सुट्टी चालू होते.
उन्हाळ्याच्या सुट्टीत क्रिकेट, खो-खो, कबड्डी, बास्केट-बॉल आणि इतरही काही मैदानी खेळ आम्ही खेळतो. तसेच ते खेळ खेळत असताना सोसायटीमधल्या काकूंची खाल्लेली बोलणी, कोणी ओरडले तर लपून बसायचे, खूप मजा येते उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळताना. एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या घरी बाहुलीचा लग्न लावायचं त्यामध्ये आपणच सर्वजण वऱ्हाडी मंडळी बनायचं ,जेवण सुद्धा आम्ही या लग्नामध्ये बनवतो, प्रत्येकाने घरून थोडं-थोडं सामान आणून आम्ही चुलीवर मसालेभात बनवतो. लग्न लावल्यानंतर आम्ही जेवायला बसतो खूप आवडीने आम्ही सर्वजण स्वतः बनवलेला तो भात खातो. खूपच मजा येते या भातुकलीच्या खेळात. कधी-कधी कोणाच्या तरी घरी बसून कॅरम खेळायचा, नवा व्यापार, पत्ते आणि सापशिडी खेळायची. असे काही बसून खेळायचे खेळ सुद्धा आम्ही खेळतो आणि ते खेळात असताना खूप भांडतो सुद्धा.
तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत खूपच छान अशी सर्वांच्या आवडीची अननस, कलिंगड, टरबूज, द्राक्ष, जांभळं यांसारखी मन तृप्त करणारी फळे आणि करवंदासारखा रानमेवा सुद्धा खायला मिळतो. सर्वात महत्वाचं फळ राहिलाच की, आंबा हा तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातात. आई त्याचा आंब्याचा रस बनवते, गुळंबा करते, कैऱ्याचं लोणचं करते. आंबा म्हणजे आपली उन्ह्याळ्याच्या सुट्टीतली एक मेजवानीच असते. सुट्टीत चोरून कैऱ्या पाडणे, चिंचा पाडणे, चोरून आंबे खाणे आणि कोणी ओरडले तर पळून जाणे किती मजा येते ना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये? कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, आंबाच सरबत यांसारखी मनाला सुखवणारी पेये प्यायला मिळतात.
आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात समुद्र किनाऱ्यावर फिरायला जातो. गणपतीपुळे, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर अशा काही कोकणातील पर्यटन स्थळांना आम्ही गेलो आहोत. खूप वेगळं असं तेथील वातावरण आहे. गणपतीपुळे येथे गणपती मंदिरासमोरच अथांग असा समुद्र आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच खूप प्रसन्न आणि शांत वाटते. मंदिराच्या परिसरामध्ये उभे राहून समुद्र पाहायला खूप छान वाटते. दिवेआगरला सुद्धा सुवर्ण गणेश मंदिर आहे. समुद्रामध्ये आम्ही खूप मजा करतो. हरिहरेश्वरला शंकराचे मंदिर आहे आणि त्याच्या समोरच खूप सुंदर असा समुद्र आहे. पांढरे शुभ्र पाणी आणि उसळत्या लाटा पाहायला खूप आनंद वाटतो. कोकणातील मासे आणि आंबे हे भारतात आणि भारताबाहेरही निर्यात केले जातात. तिथे नारळ, सुपारी, आंबे आणि काजू यांच्या बागा आहेत.
कोकणाबरोबरच उन्हाळ्याची सुट्टी संपण्याआधी आम्ही देवस्थानांना पण गेलो होतो. जसे की कोल्हापूरची महालक्ष्मी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, तुळजापूरची तुळजा भवानी आणि रांजणगावचा महागणपती या ठिकाणी आम्ही गेलो होतो. त्यानंतर मी सुट्टीमध्ये मावशीकडे,मामाकडे आणि काका-काकूंकडे थोडे दिवस राहायला गेले होते.
तिथे आम्ही खूप धमाल केली, खरेदी केली. आम्ही भावंडं तिथे एका उन्हाळी शिबिरात जायचो. शिबिरामध्ये एका ताई होती ती आमचे खेळ घ्यायची. त्यानंतर ती ताई आमच्यापैकी कोणालाही एखादी गोष्ट ,जोक किंवा गाणं म्हणायला सांगायची. त्यानंतर आम्हाला तिथे नाश्ता मिळायचा. या शिबिरामध्ये आम्हाला खूप मित्र-मैत्रिणी भेटल्या. या शिबिरात आम्ही सुट्टीचा खूप आनंद लुटला. त्यानंतर मी माझ्या घरी परतले आणि पुढील वर्षीची शाळेची तयारी केली आणि त्यानंतर माझी शाळा चालू झाली .
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा माझी उन्हाळाची सुट्टी वर निबंध (My summer vacation Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा My summer vacation Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप
लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा माझी उन्हाळाची सुट्टी वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.