नागपंचमी वर निबंध |Nagpanchami Essay in Marathi |Nagpanchami Nibandh

Nagpanchami Essay in Marathi |Nagpanchami Nibandh

सर श्रावणाची सांगे, गोड गुपित कानांत ।

झुला फांदीवरचा गं, श्रावणाचे गातो गीत ।

ह्या ओळी ऐकल्या, की लगेच आपल्या डोळ्यापुढे श्रावण पंचमी साठी झाडावर बांधलेले झोके आठवतात. झोक्यांवर झुलणार्या मुली आठवतात. दारीफेर धरून चाललेली नागपंचमी गाणी आठवतात. “चल ग सखे वारूळाला – नागोबाला पुजायला…” या ओळी ओठावर येतात. खरं ना? बरोबरच आहे. कारण श्रावण महिन्यातला हा पहिला सण नागपंचमी. सर्व स्त्रिया, मुली ह्यांना अगदी हा हवासा वाटणारा सण. सर्वच मोठ्या उत्साहने साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया नागदेवतेची मनापासून भक्तीभावाने पूजा करतात त्या नागाला दूध पाजतात. शेतकरी ह्या दिवशी शेत नांगरत नाही. स्त्रिया भाजी चिरत नाहीत, तवा ठेवत नाहीत.

नागपंचमीचा सण हा त्या नागदेवतेबद्दल कृतज्ञता आदर व प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. ह्या सणाला देवापुढे पाटावर गंधाने नाग नागोबा-नागीण तिची पिल्ले काढतात. त्याची पूजा करतात. नागस्तोत्र म्हणतात. दूध, लाह्या ह्यांचा नैवेद्य दाखवतात आणि पूजा करून प्रार्थना करतात की हे नागराजा! आमचे संरक्षण कर, कृपा कर.

इथं आठवण होते ती आई, आजी ह्यांच्याकडून ऐकलेल्या एका गोष्टीची, तशा तर ह्या सणाबद्दल अनेक लोककथा प्रचलित आहेत. पण आठवणीत राहिलेली ती गोष्ट अशी की..

एका गावात एक शेतकरी रहात होता. त्याला एक मुलगी होती. तिचं नाव सुशिला. ती गुणी सुस्वाभावी अन् लाघवी होती. ती सर्वांवर प्रेम करायची. सर्वांचा आदर करायची. आपल्या सेवाभावी वृत्तीनं ती सर्वांची मनं सहजतेन जिंकून घ्यायची. एकदा काय झालं. तो शेतकरी आपले शेत नांगरत असताना नांगराचा फाळ एका वारूळाला लागला. त्या वारूळातली नागोबाची पिल्लं त्यामुळे जखमी झाली. एक-दोन मेली सुद्धा. ह्या गोष्टीचा नागोबाला फार राग आला. आपल्या पिल्लांना मारणार्या त्या शेतकर्याच्या मुलांना मारण्यासाठी नाग-नागिणीने शेतकर्याच्या घरी आपला मोर्चा वळवला. तो दोघं शेतकर्याच्या घरी आली. तो काय?

शेतकर्याची मुलगी सुशिला ही आपल्या धाकट्या भावंडासह नागोबाची पूजा करत होती. तो दिवस होता नागपंचमीचा. सुशिलेनं पाटावर नाग-नागिण तिची पिल्लंही गंधानी काढली होती. त्या सर्वांना हळद-कुंकू, आघाडा दुर्वा-फुले वाहिली होती. दूध लाह्या पुढ्यांत ठेवल्या होत्या. हात जोडून सुशिला सांगेल तशी ती भावंड नागराजाला प्रार्थना करत होती की – “हे नागराजा! आम्ही तुझी पूजा करतोय. तुझा आदर करतोय पण जर चुकून माकून जरी आमच्या कोणाच्या हातून तुला किंवा तुझ्या पिल्लांना जर काही इजा झाली असेल. तुला कुणी त्रास दिला असेल तर हे नागराजा तू आम्हाला क्षमा कर. आमच्यावर दया कर. कृपा कर. आम्हाला सुखी ठेव.” सुशिला आणि तिची भावंडांनी मनापासून केलेली प्रार्थना ऐकली मात्र… आणि सूडाच्या भावनेनं शेतकर्याच्या घरी आलेल्या नाग-नागिणीचं मनं परिवर्तन प्रसन्न होत त्यांना मंगल आशिर्वाद दिले. अपराधी शेतकर्यालाही शासन न करता दयेच वरदान देत नाग-नागिणीची जोडी निघून गेली.

गोष्ट छोटीच पण त्यातला बोध मात्र मोठा कि प्रेमानं कुणालाही जिंकता येतं. दुष्ट वृत्तीचं सद्प्रवृत्तीत परिवर्तन होतं कारण निरपेक्ष प्रेमात मोठी ताकद असते. पंचमीचा हा सण माणूस आणि प्राणी ह्यांच्यात एक नवा प्रेमबंधाचा धागा विणून जातो हेच खरं…….!

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा नागपंचमी वर निबंध (Nagpanchami Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Nagpanchami Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा नागपंचमी वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment