Our Mumbai Essay in Marathi |Our Mumbai Nibandh
अलीकडे असा एकही दिवस उगवत नाही की, वर्तमानपत्रांत काही ना काही निमित्ताने मुंबईच्या गर्दीचा उल्लेख नाही. हाशहुश्श करीत आणि माणसांच्या गर्दीला शिव्याशाप देत प्रत्येक मुंबईकर मुंबईतच राहत असतो. मुंबईच्या गर्दीबद्दलची चर्चा जेवढी गर्जत असते, तेवढेच मुंबईत येणारे माणसांचे लोंढेही सतत वाढत असतात आणि हे सारे पाहून ‘आमची मुंबापुरी’ मात्र गालातल्या गालात हसत असते.
नाहीतरी या मुंबापुरीचं सारंच आगळंवेगळं. अगदी चिचोळ्या आकाराची ही लहान सात बेटे. सभोवताली सारं खारं पाणी. माडाच्या आणि ताडाच्या वाड्यांनी भरलेली आणि ताज्या म्हावऱ्याच्या वासाने दरवळलेली ही बेटे कुणी राजाने आपल्या लेकीला आंदण दिली आणि जावयाने ती व्यापारी कंपनीला विकून टाकली. त्याचक्षणी या बेटांचे भाग्य उजळले. अशी हिची मजेशीर दंतकथा आहे. ही बेटे एकमेकांना जोडली गेली आणि एक नगरी निर्माण झाली. त्या नगरी वाढतच आहे. समुद्राला समांतर ठेवून ती आपले हातपाय पसरतच राहिली आहे. आजचे तिचे स्वरूप पाहून लेखक अरविंद गोखले तिला ‘महामाया’ म्हणतात.
या नगरीला मुंबापूरी नाव मिळाले ते तेथील देवतेच्या-मुंबापुरीच्या अधिष्ठानाने. या घाईगर्दीच्या शहरात आजही अनेक देवदेवता मोठ्या वैभवाने आपले अधिराज्य गाजवीत आहेत. पिकेट रोडवरचा मारुती, सागरकिनारी उभी असलेली महालक्ष्मी, उंचावर बसलेला सर्वसाक्षी बाबुलनाथ, कोर्टकचेऱ्यात गाजलेला विश्वविख्यात सिद्धिविनायक या बड्यांबरोबर इतर छोटेमोठे भगवान जागोजागी भेटतात. पण म्हणन काही ही मबापूरी काशीप्रयागसारखे धार्मिक क्षेत्रस्थान ठरत नाही. तर अनेक बुद्धिवंतांची ही कर्मभूमी आहे. नेहरू प्लॅनेटेरियम, भाभा अणुकेंद्र येथे अखंड ज्ञानसाधना चालू आहे. आज शेसव्वाशे वर्षे झाली तरी मुंबई विदयापीठ येथे आपला आब राखून आहे.
‘देशातील महान औदयोगिक नगरी’ हे सन्मानाचे मोरपीस तर मंबापुरीने आपल्या मस्तकी केव्हाच खोचले आहे. पण आज तेच तिच्या दुःखाचे कारण झाले आहे. प्रदूषित वातावरण हे मुंबईच्या कीर्तीला लागलेले गालबोट आहे. गगनाला भिडणाऱ्या सिमेंटच्या जंगलांनी मुंबईतील ताडामाडाच्या वाडया केव्हाच नष्ट केल्या आहेत. आता आमच्या या मुंबापुरीत दिसतात केवळ उंच इमारती, त्यावरच्या दूरचित्रवाणीच्या अँटेना आणि झोपडपट्टया व त्यांच्या भोवतालचे उकिरडे.
खरं पाहता, या नगरीचे अंतःकरण मोठे उदार, सर्वसमावेशक आहे. म्हणून तर येथे सगळ्या जातींचे, सगळ्या पंथांचे, सगळया धर्माचे लोक आनंदाने नांदतात. जगाच्या कानाकोपऱ्यातून माणसे या महापुरीत येतात ती आपले नशीब आजमावयाला. कलावंतांच्या कलेचीही ही नगरी योग्य बूज राखते, विद्वानांच्या विदयेला वाव देते. आणि व्यापाऱ्यांच्या मालाला न्याय देते. तिची स्वतःची एक भाषा आहे, मग ती राज्यभाषा मराठी असो वा राष्ट्रभाषा हिंदी असो. तिच्यावर ‘मुंबईचा’ एक वेगळा ठसा आहे. स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाने नांदणारी ही मुंबापूरी आहे; मग कुणी तिला मुंबई म्हणो वा बॉम्बे म्हणो, ती आहे आमची आगळीवेगळी मुंबापुरी!
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा आमची मुबंई वर निबंध (Our Mumbai Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा Our Mumbai Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा आमची मुबंई वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.