Sant Chokhamela Essay in Marathi | Sant Chokhamela Nibandh
संत चोखामेळा ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात ते अडकले. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ . उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, मात्र विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते परंतु प्रत्यक्ष परमेश्र्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. इतरांप्रमाणे आपणही श्रीविठ्ठलाला उराउरी भेटावे असे खूप वाटत होते परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.
चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ … असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.
संत चोखोबांचे भावविश्र्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्न ते देवालाच विचारतात. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणा-या आहेत.
‘धाव घाली विठू आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।’
‘जोहार मायबाप जोहार। तुमच्या महाराचा मी महार। बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।।’
‘आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।’
‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।। चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।’
‘विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।’
हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत. या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते संत चोखोबा मंगळवेढयाचे होते. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उध्दाराची सतत चिंता होती. त्यांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले. गावगाड्यातील गावकुसाचे काम चालू असताना भिंत पडून सर्व कामगारांचा अंत झाला. चोखोबाही त्यात होते. संत नामदेवांनी जेव्हा सर्व अस्थी गोळा केल्या तेव्हा ज्या अस्थीतून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नाद ऐकू आला त्या अस्थी चोखोबाच्या होत्या असे म्हणतात. नामदेवांनी मात्र चोखोबांना विठठलाजवळच अढळ स्थान दिले. पंढरपूरच्या देवळाच्या महाद्वारात पायरी जवळ नामदेवांनी संत चोखोबांची समाधी बांधली आहे.
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा संत चोखामेळा वर निबंध (Sant Chokhamela Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा Sant Chokhamela Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप
लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा संत चोखामेळा पर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.