श्रावण महिना वर निबंध | Shravan Month Essay in Marathi | Shravan Month Nibandh

Shravan Month Essay in Marathi | Shravan Month Nibandh

मराठी महिन्यांपैकी एक महत्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यालाच सणांचा महिना असेही म्हणतात. याची आपण सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतो. विशेषतः स्त्रियांच्या आवडीचा आणि हवाहवासा वाटणारा हा श्रावण महिना याची सर्व स्त्रिया व मुली आतुरतेने वाट पाहत असतात. कारण याच महिन्यात आपल्या भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे बरेच सण असतात. त्यामुळे स्त्रियांना नटायला मिळते, हौसमौज करायला मिळते. या निबंधामध्ये आपण ‘माझा आवडता महिना श्रावण’ या विषयावर निबंध पाहणार आहोत. या निबंधावरून तुम्ही ‘श्रावणातील गमती जमती’, ‘माझा आवडता महिना श्रावण’, ‘श्रावण सणांचा महिना’, ‘श्रावण सरी’ या विषयांवर निबंध, लेख लिहू शकता किंवा भाषण सुद्धा करू शकता.

‘श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’ असा हा श्रावण महिना खूप फसवा असतो. ऊन पडले आहे असे म्हणता म्हणता पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागतात. श्रावणातील हा ऊनपावसाचा खेळ पाहून मन हरवून जाते. अवचित कधीतरी सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मंगल तोरण आकाशाला एक वेगळीच शोभा आणते. तसेच हा श्रावण पक्ष्यांचा राजा मोर यास डौलदार पिसारा फुलवून नृत्य करण्यास आव्हान करतो. पावसाच्या सरी कोसळू लागल्या की मोराला थुई थुई नाचायला प्रोत्साहन चढते. अशातच पिसारा फुलवून नाचताना त्याची छबी कॅमेरामध्ये टिपतानाचा अनुभव हा खूपच अविस्मरणीय असतो.

चैत्रापासून सुरु होणाऱ्या या मराठी महिन्याचे रंगरूप आगळेवेगळेच असते. मला स्वतःला आवडतो आणि हवाहवासा वाटतो तो हा ‘हिरवा श्रावण’. श्रावणात सृष्टीत सर्वत्र हिरव्या रंगाची उधळण झालेली असते. हिरव्या रंगातही किती विविध छटा असतात. कुठे गर्द हिरवा, तर कुठे प्रसन्न हिरवा, तर कुठे पोपटी अशा रंगछटा सर्वत्र पाहायला मिळतात. श्रावणात वेली, वनस्पतींना नवीन पालवी फुटलेली असते. हे दृश्य पाहून असे वाटते की, जणू काही सृष्टीने नववधूचा वेशच धारण केला आहे. फळाफुलांनी वृक्षही बहरून गेलेले असतात. गवते आपली पिवळी कात टाकून हरित वस्त्रे परिधान करतात.अशा वातावरणात खूपच प्रसन्न वाटते. पावसाच्या सरी कोसळून गेल्या की, पक्षी आपले इवलाले पंख झटकून पिलांसाठी चारा आणायला घरट्याबाहेर पडतात.

‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा’ अशी पावसाची गाणी गुणगुणत पावसाच्या रिमझिम सरी अंगावर घेत लहान मुले चिंब भिजतात आणि आनंदाने उड्या मारतात. लहान मुले कागदाच्या होड्या करून पावसाच्या वाहत्या पाण्यात सोडतात. तसेच कार्यालयात जाणारे येणारे लोक छत्र्या, पिशव्या सांभाळत ऑफिस गाठण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच एखाद्या दिवशी छत्री, रेनकोट सोबत घेतला नाही आणि जर अचानक खूप पाऊस आला तर सर्वांचीच पळता भुई थोडी होते. असा हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा ‘श्रावण महिना’ आहे. कारण पाऊस पडताच सर्वांना गरमागरम कांदा भाजी व चहा यांची मेजवानी मिळते. जर जास्त पाऊस झाला तर विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी मिळते त्यामुळे विद्यार्थीही खूप आनंदात असतात.

शेतकरी सुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण याच महिन्यात शेतीची बरीच खोळंबलेली कामे त्यांना या महिन्यात पूर्ण करायची असतात. श्रावणसरींच्या स्पर्शाने आपल्या या शेतकरी बांधवाच्या शेतातील पिके आपल्याला आनंदाने डोलताना दिसतात. त्यावेळी आपल्या या शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद आपल्याला पाहायला मिळतो.

श्रावणमास म्हणजे व्रतवैकल्यांचा आणि सणावारांचा महिना. श्रावणातील सोमवारांचे खूप माहात्म्य आहे यादिवशी बऱ्याच लोकांचा उपवास असतो. मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. तसेच शनिवारी मारुतीची आराधना केली जाते. या श्रावणात माणूस आपल्या उपकारकर्त्या निसर्गबांधवांनाही विसरत नाही. म्हणून तर उंदरांपासून पिकांचे संरक्षण करणाऱ्या नागांची नागपंचमीला पूजा केली जाते. तर नारळीपौर्णिमेला सागराला भक्तिभावाने नारळ अर्पण केला जातो.

श्रावणातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी स्त्रीपुरुष भाविक उपवास करतात आणि कृष्ण जन्माचा सोहळा साजरा करतात. श्रावणातील नवमीला बालगोपाल गोपाळकाला, दहीहंडी साजरी करतात. त्यानंतर येतो तो बैलपोळा. यालाच श्रावणी पोळा असेही म्हणतात. शेतकरी आपल्या बैलांच्या गळ्यात घुंगराच्या माळा घालतात त्यांची सजावट करतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलाची पूजा करतात त्यांना नैवेद्य दाखवतात आणि सर्व गावकरी मिळून या बैलांची गावामध्ये मिरवणूक काढतात.

प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा श्रावण महिना वर निबंध (Shravan Month Essay in Marathi) आवडला असेल.

जर तुमच्या कडे सुद्धा Shravan Month Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप
लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..

तसेच तुम्हाला हा श्रावण महिना पर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment