The beach I saw Essay in Marathi |The beach I saw Nibandh
नमस्कार मित्रांनो आज बघणार आहोत मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी , अथांग निळा सागर, त्याच्या उसळणाऱ्या लाटा, त्यांच्यावर दिसणारा पांढरा फेस अशा या विलोभनीय दृश्याचे मला विलक्षण आकर्षण वाटते. त्या फेसाळणाऱ्या लाटा पुढे पुढे येतात आणि सागराच्या किनाऱ्याला शिवून मागे फिरतात, तेव्हा एक लाट केव्हा संपली आणि दुसरी केव्हा सुरू झाली हे उमगतच नाही. लाटांचा हा पाठशिवणीचा खेळ मनसोक्तपणे पाहावा हा माझा छंद. ओहोटीच्या वेळी पसरलेला तो अफाट मोठा वाळूचा किनारा आणि भरतीच्या वेळी त्याला गिळू पाहणारा तो सागर, हे परस्परांशी जणू गप्पाच मारीत आहेत असे मला वाटते. त्यांचा तो संवाद शब्दाविना असला तरी तो माझ्या मनाला उमगतो आणि मग अनेकदा मी समुद्राच्या सान्निध्यात जातो.
मला आवडतो तो मोकळा समुद्रकिनारा. अथांग सागर आणि त्याची विशाल पुळणी. मग तेथे मला गवसते उदात्तता, भव्यता. मन कधीही बेचैन झाले की मी समुद्राच्या सान्निध्यात जातो. त्याची ती भव्यता माझ्या मनातील कस्पटतेची मला जाणीव करून देते. माझ्या मनातील क्षुद्र अहंकार त्या लाटांच्या फेसाबरोबर वाहून जातो. मन निर्मल होते. मनाचे पिंजरे तुटून पडतात आणि भव्यता, उदात्तता मनाला व्यापून टाकते. स्वतःच्या क्षुल्लक दु:खांचा विसर पडतो आणि मग मन भोवतालची सुखे, आनंद, संतोष टिपू लागते. हात भोवतालच्या वाळूशी नकळतपणे खेळ खेळू लागतात. मुठीत धरलेली वाळू पाहता पाहता गळून पडते. सूर्यकिरणांत तिच्यातील सप्तरंग उठून दिसतात. मग त्या वाळूतील रंगीबेरंगी शंखशिपले डोळयांना मोहवू लागतात. एक सापडली, दुसरी सापडली असे करता करता दोन्ही हात भरून जातात. त्या शंखशिंपल्यांच्या रंगांत विविधता असते. प्रत्येकाचा आकार आगळावेगळा असतो. विधात्याच्या या निर्मितीने मन वेडावून जाते.
पण-पण असा हा माझा सागर, असा हा माझा रत्नाकर आता मुंबईत कोठे राहिला आहे? ती विशालता, ती अथांगता आज हरवून गेली आहे. समुद्रकिनारी मनाची शांतता शोधायला जावे, तर ती देखील आता तेथे लाभत नाही.
समुद्राचा विशाल पुळणीकाठ माणसाने हिरावून घेतला आहे. माणसाने आपला दिमाख दाखविण्यासाठी तेथे उंच इमारती उठविल्या आहेत. कुठे पोहण्याचे तलाव उभे राहिले आहेत, तर कुठे पंचतारांकित मोठमोठी हॉटेल्स उभारण्यात आली आहेत. तर कुठे समुद्रातील ते सुखी जीव-ते मासे-त्यांना कोंडून ठेवण्यासाठी मत्स्यालय उभारले आहे. उरल्यासुरल्या सांगरकिनाऱ्यावर भेळपुरीच्या गाड्यांनी आक्रमण केलेले आहे. आपले जिव्हालौल्य भागवून माणसे तेथे जो केरकचरा टाकतात त्यामध्ये माझी सागरातील रंगीबेरंगी रसिकता हरवून जाते.
एवढा तो विशाल रत्नाकर, त्याची तरी माणसाने काय स्थिती केली आहे? एकेकाळी रावणाने सीताहरण केले म्हणून या पयोधीला सेतूचे बंधन पडले ; तेव्हा कविमंडळी हळहळली. पण आज मोठमोठ्या शहरांतून गढूळ, दूषित पाणी या सागरालाच अर्पण केले जाते. आता तर आपल्या विज्ञानाची घमेंड येऊन मानव सागराच्या अंतःकरणातील स्नेहच हिरावून घेऊ पाहत आहे. या साऱ्या कर्तृत्वात शांत, उदात्त सागरसहवास मात्र संपला आहे आणि उरला आहे केवळ कोलाहल!
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा मी पाहीलेला समुद्र किनारा वर निबंध (The beach I saw Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा The beach I saw Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप
लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा मी पाहीलेला समुद्र किनारा वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.