What is a scientific approach? Essay in Marathi | What is a scientific approach? Nibandh
‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ हा हल्ली वाक्प्रचार म्हणून वापरला जातो असं माझं मत आहे. आपल्याला न पटलेल्या गोष्टींवर हा वाक्प्रचार एखाद्याच्या तोंडावर फेकून मारला, की मग पुढची चर्चाच खुंटते.
वैज्ञानिक दृष्टीकोन हे वाक्य आपल्या देशात मुख्यत: विज्ञानाशी संबंधीत गोष्टींशी, म्हणजे जे आपण बेसीक विज्ञान समजतो त्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि जीवशास्त्र या तीन शाखांशी, मर्यादीत असतो असा आपला सर्वसाधारण समज. हा घोळ ‘विज्ञान’ या शब्दाची सांगड ‘सायन्स’ या इंग्रजी शब्दाशी घातली गेली म्हणून होत असावा, असं मला वाटतं. परंतू विज्ञान तेवढ्यापुरतं मर्यादीत नाही असंही मला वाटतं. रोजच्या जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे, मग ती कोणतीही साधी गोष्ट असो. उदाहरणार्थ, मुंबईत बीएसटीच्या बसमधून पुढच्या दरवाजाने का उतरावं, ते एसटी बसच्या कंडक्टरची सीट मागच्या दरवाजापाशी का असते, यातही विज्ञान आहे. किंवा कोणताही कुत्रा धावताना, त्याचे पुढचे दोन पाय मागच्या दोन पायांच्या सरळ रेषेत नसतात. पुढचे पाय मागच्या दोन पायांच्या तुलनेत किंचित डावीकडे पडतात. यातही विज्ञान आहेच. या विज्ञानाची सुत्र मांडता येतीलही, परंतू त्यात मुळात काही विज्ञान आहे हेच आपल्या गांवी नसतं आणि त्यामुळे ‘असं का?’ हा प्रश्न आपल्याला पडत नाही, हे मुख्य कारण हे आहे.
विषय कोणताही असो, ‘असं का’ हा प्रश्न स्वत:ला पडणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन असं मला वाटतं. आपण अंधश्रद्धा या लेबलखाली अनेक गोष्टींवर विचार करायचं टाळतो, कारण तसं करणं स्वत:ला शिणवण्यापासून वाचवणारं असतं. आपल्या सुरुवातीपासूनच्या अभ्यासक्रमातही प्रश्न विचारायला वाव ठेवलेला नाही. त्यामुळे आपलं कुतुहल लहान वयातच मारलं जातं आणि त्यामुळे आपल्या देशात मुलभूत संशोधन होत नाही. आपल्या देशात ‘अंधश्रद्धा’ असं नांव दिलं की मग त्यावरची चर्चा टाळली, नव्हे मारली जाते. आपल्या प्राचिन संस्कृत ग्रंथांची अशीच हेळसांड होत होती. जर्मनीतल्या मॅक्समुल्लर या विद्वानाने जेव्हा त्याचा अभ्यास करुन त्याची महती आपल्याला सांगीतली, तेंव्हा त्यांचं महत्व आपल्याला समजलं. हळददीचे औषधी उपयोग आपल्या पूर्वजांना गेल्या शेकडो-हजारो पिढ्या माहित आहेत. त्यांना ते तसं लिहूनही ठेवलं आहे. पण आपलं जे जे प्राचिन ते ते अंधश्रद्धेशी निगडीत अशी काहीचरी विचित्र समजूत आपण करुन घेतली असल्याने, आपल्या पूर्वजांनी हळदीविषयी जे लिहून ठेवलंय, ते तसं का लिहिलंय या विषयी आपल्याकडे कुतूहल जागृत झालं नाही व म्हणून त्यावर आधुनिक युगात संशोधन झालं नाही. अमेरीकनांनी नेमकं हेच टाळलं आणि त्यावर संशोधन केलं आणि ते हळदीचं पेटंट घ्यायल्या गेल्यावर आपण जागे झालो आणि दीर्घ लढाईनंतर ते पेटंट डाॅ. रघुनाथ माशेलकरांनी मिळवलं. ही कहाणी सर्वांनाच माहित आहे..
आपल्या प्राचीन प्रथा-परंपरा, दैवतं यांचंही असंच आहे. त्यामागे निश्चित असा कार्यकारण भाव आहे आणि आपल्या पूर्वजांनी त्याकाळच्या जनमानसाला झेपेल अशा भाषेत तो सांगीतला आहे. यावर आधुनिक युगात विशेष संशोधन व्हायला हवं. शेवटी विज्ञान या शब्दाचा सामान्य अर्थ विशेष ज्ञान असा होतो. आपल्या या प्रथा-परंपरा किंवा दैवतं यावर विशेष ज्ञान मिळवण्याचा फारसा प्रयत्न आपल्याकडे झालेला नाही आणि या सर्वांकडे अंधश्र्द्धा म्हणून शिक्का मारला गेला. या प्रथा परंपरा किंवा दैवत ह्यांचा आता अभ्यास करताना तो त्या काळात जाऊन करावा आणि आधुनिक काळात त्याचा अर्थ काय हे उलगडून सांगणं म्हणजे विज्ञान किंवा वैज्ञानिक दृष्टीकोन असं मी समजतो..यासाठी दैवतांना पुजताना आणि प्रथा पाळताना, दैवतं म्हणजे काय आणि प्रथा का पाळावी हे प्रश्न आपल्याला पडणं आणि त्यांचं उत्तर शोधणं आणि त्यातील पटलेल्या गोष्टी घेऊन न पटलेल्या गोष्टींचा त्याग करणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन असं मला वाटतं..
पुराणांमधे आढळणारे पुष्पक विमान ही चिज आताचं विमानाची मुळ आवृत्ती असं आताच्या काळात आपल्याला पटण्यासारखी नाही हे तर खरंच. परंतू विमानाचा तो उल्लेख त्या काळात आलाय हे ही खरंय;तर मग तो नेमक्या कुठल्या संदर्भात आला किंवा विमान म्हणवली गेलेली ती वस्तू नेमकी काय होती, याचं संशोधन आणि त्या संशोधनाची तर्कसंगत मांडणी म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन असं मला वाटतं.
वैज्ञानिक दृष्टीकोनाचा आग्रह योग्य असला तरी आपल्या आजुबाजूला काही गुढत्व असणं ही मानवी मनाची गरज आहे असं मला वाटतं. इथे मी प्रखयात स्त्रीरोग तज्ञ डाॅ. बा. नि. पुरंदरेंचं उदाहरण देईन. डाॅ. पुरंदरे शस्त्रक्रीया करण्यापूर्वी कुंडली बघत असं त्यांनी आपल्या ‘शल्य कौशल्य’ या पुस्तकांत लिहिलंय. डॉ. पुरंदरे डॉक्टर होते म्हणजे त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोन होता असे म्हटले पाहिजे. तरी कुंडलीच्या गुढत्वाविषयी त्यांना आकर्षण होते अस यावरून म्हणावं लागतं. ‘युरोपीय देश किंवा एकुणच पाश्चिमात्य देश नक्कीच वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे आहेत असं आपण समजतो आणि ते बऱ्याच अंशी खरंही आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे नवनविन शोध लागत असतात. पण असं असलं तरीही त्यांच्याकडे भुतादी कल्पना आहेत आणि त्यावर विश्वास ठेवणारी लोकंही आहेत. ‘डिस्कव्हरी’ किंवा ‘नॅशनल जिओग्राफिक चॅनेल’वर ‘हाॅंटींग’ या भुतबाधेवर आणि ती भुतबाधा उतरवण्ऱ्या लोकांच्या सिरियल्स बघताना हे लक्षात येतं. ही दोनही चॅनल्स वाह्यात गोष्टी दाखवण्यासाठी बदनाम नाहीत हे इथे लक्षात ठेवायला हवं. तसंच ख्रिश्चन धर्म माणसाला अशक्य अशा चमत्कारांवर आजही विश्वास ठेवताना दिसतो. मदर तेरेसानी डाॅक्टरांनी जगण्याची आशा सोडून दिलेला पेशंट बरा करण्याचा ‘चमत्कार’ करून दाखवला होता. पाद्र्याना फादर किंवा मदर होण्यासाठी चमत्कार दाखवावाच लागतो. त्याशिवाय त्याना फादर किंवा मदर होता येत नाही. इथे ख्रिश्चन धर्माचं उदाहरण एवढ्यासाठीच दिलंय, कारण आधुनिक वैज्ञानिक जगतात या धर्माचे अनुयायी जास्त आहेत म्हणून. बाकी जगातील सर्व धर्मात मानवी बुद्धीला न पटणाऱ्या आणि विज्ञानाच्या कसोटीवर न टिकणाऱ्या ह्या गोष्टी कमी-अधिक प्रमाणात आहेतच. आपल्याकडे हेच काम बाबा-बुवा-माॅं किंवा माताजी करतात.
आपले प्राचीन ग्रंथ काय किंवा बायबल, कुराण काय यातील घटना आताच्या आपल्या बुद्धीवा न पटणाऱ्या आहेत. असं असलं तरी ते ग्रंथ ज्या काळात रचले गेले त्या काळातील लोक, त्यांच्या बुद्धीचं त्या काळचं आकलन, त्यांनी तसं लिहिण्यामागचा त्यांचा उद्देश काय असावा आणि त्या आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर कशा पद्धतीने मांडता येतील, ह्याचा विचार करणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन असं मला वाटतं..
एक शेवटचं उदाहरण देतो आणि हा विषय आवरता घेतो. आपल्या पुराणांत मारुतीच्या जन्माची कथा आहे. अंजनीच्या पोटी नुकत्याच जन्म घेतलेल्या ‘मारूती’ला सूर्यबिंब गिळावेसे वाटते व तो सूर्याच्या दिशेने झेप घेतो असं वर्णन आहे. हे मानवी बुद्धीला न पटणारं आणि शरीरालाही न झेपणारं वर्णन आहे. परंतू यावर थोतांड किंवा अंधश्रद्धा म्हणून शिक्का मारून चालणार नाही. तर त्याकाळात असं लिहिणारांनी तसं का लिहिलं असेल याचा विचार आजच्या वैज्ञानिक सत्याचा आधार घेऊन करायला हवा तरचं तो वैज्ञानिक विचार म्हणता येईल. पुराणातील मारुती म्हणजे मरुत म्हणजे वारा. क्षणात कुठेही आणि कसंही उडणं हे केवळ वाऱ्यालाच शक्य आहे..म्हणजे वाऱ्याची ही अफाट शक्ती मारुतीच्या रुपात आपल्या पुराणांमधे आली असं म्हणता येईल. ही कथा पुढं असं सांगते की, मारुतीला आपल्याकडे येताना पाहून सूर्य आपलं शस्त्र मारूतीकडे फेकून मारतो व ते मारूतीला लागून मारूती बेशुद्ध पडतो. वातावरणाच्या बाहेरील निर्वात पोकळीत वारा पोहोचू शकत नाही (म्हणून निर्वात पोकळी) व परिणामी बेशुद्धी येते हे आपल्याला आधुनिक सायन्स सांगते..मारुती जन्मकथेच्या रुपाने हे सत्य आधुनिक काळात समोर येतं असं मला वाटतं..
आपल्या प्राचीन पूर्वजांना निसर्गाची अफाट ताकद म्हणजे एक चमत्कार वाटला असावा आणि त्या ताकदी पुढे आपली मानवी क्षमता नगण्य वाटली असल्याने निसर्गातील आग, वायु, पाऊस वा वाघ, सिंह, हत्ती, साप आदिंना देवता स्वरूप दिलं गेलं असावं..या देवतांच्या पराक्रमाच्या कथा गुंफल्या गेल्या असाव्यात..आपल्या पुराण कथा, प्रथा-परंपरा यात असाच मोठा अर्थ भरलेला आहे..त्या केवळ भाकडकथा म्हणून हसून सोडून देता कामा नयेत..त्याचा अर्थ शोधूम तो जिज्ञासूंपर्यंत पोहोचवणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन गरजेचं आहे..हे झाल पोथ्या-पुराणांसाठी. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमागच्या कार्यकारण भावाचा तर्कसंगत विचार करणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन असं मी मानतो..
सर्वच गोष्टींबद्दलचं स्वत:चं कुतुहल सतत जागृत ठेवणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन. त्याच निरीक्षण करून अभ्यास करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन. ज्ञानेश्वर बाराव्या शतकात म्हणून गेलेत, की “अगा अभ्यासाचेनि बळें| एकां गति अंतराळे| व्याघ्र सर्प प्रांजळे| केले एकीं..विष कीं आहारीं पडे| समुद्रीं पायवाट जोडे| एकीं वाग्ब्रह्म थोकडें| अभ्यासें केलें..|| म्हणजे अभ्यासामुळे आकाशात विहार करता येतो, अभ्यासामुळे वाघ आणि सर्प एकत्र खेळवता येतो, अभ्यासामुळे समुद्रातून वाट काढता येते..अभ्यासामुळे काहीही करता येते हाच तो वैज्ञानिक दृष्टीकोन.. अभ्यासामुळे, म्हणजे कुतूहल, निरीक्षण आणि प्रयोगातून काहीही साध्य करता येतं हा विश्वास म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन..
‘राष्ट्रीय विज्ञान दिनी’ वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय, यावर माझं मत (कोणीही न विचारता) मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हेच अंतीम सत्य असं माझं म्हणणं नाही, तर यावर चर्चा, आपली मतंही अपेक्षित आहेत..
प्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय? वर निबंध (What is a scientific approach? Essay in Marathi) आवडला असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा What is a scientific approach? Nibandh वर अशाच प्रकारे कोणता निबंध असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..
तसेच तुम्हाला हा वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय? वर मराठी निबंध आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.